पंक्चर काढणाऱ्याच्या मुलाची आयआयटीत भरारी

पंक्चर काढणाऱ्याच्या मुलाची आयआयटीत भरारी

अकोला : शांत समुद्र कुशल खलाशी बनवत नाही. उत्तम खलाशी होण्यासाठी खवळलेल्या समुद्रातच प्रशिक्षण घेतले पाहिजे. कारण, प्रवास करताना समुद्र नेहमीच शांत असेल असे नाही. मग जर कधी अशांत समुद्रातून इच्छितस्थळी जाण्याची वेळ आली तर आपला टिकाव लागणार नाही. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तशा प्रसंगातून जाणं आवश्यक असतं तेच आपल्याला नवनवीन धडे शिकवत असतात. असेच धडे आयआयटी अॅव्हान्स परीक्षेला बसलेल्या शिवमने घेतले आणि देशात एससी प्रवर्गातून ३७ वा रॅन्क प्राप्त केला.

शिवम हा दर्यापूर तालुक्यातील पनोरा या छोट्याशा गावातला. गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत त्याने चवथीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पाचवी ते दहावीच्या शिक्षणासाठी तो दर्यापूरच्या प्रबोधन विद्यालयात दाखल झाला. कुशाग्र बुध्दीच्या शिवम इंगळे याने दर्यापूरसारख्या ठिकाणाहून दहावीत ९५ टक्के गुण प्राप्त केले. 

शिवमचे वडील दर्यापूर येथे पंक्चरचे दुकान चालवितात. आई गावातच शिवणकाम व शेतीकामात त्यांना मदत करते. मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा एवढी प्रगती करूच शकत नाही, अशी शहरात राहणाऱ्या पालकांची धारणा असते. परंतु, शिवमने या सगळ्या परिस्थितीवर मात करून भरघोस यश संपादन केले. खेड्यातील मराठी माध्यमातून शिकलेला. घरची आर्थिक परिस्थिती साधरण, ना मोबाईल, ना गाडी, किंवा इतर कोणत्याही भौतिक सुविधा नसतानाही त्याने मोठी गरुडझेप घेतली. 

दहावीनंतर त्याने अकोल्यात येवून जेईई अॅडव्हॉन्सची तयारी केली. त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांमुळेच तो भरारी घेऊ शकला असल्याचे सांगतो. कुठल्याही प्रकारचे फाऊंडेशन क्लास नाही, ट्यूशन क्लास नाही, कौटुंबिक परिस्थिती नाही. तशी कुटुंबात पुढील शिक्षणाबद्दलची माहितीही नाही. मात्र, या सर्व गोष्टींवर मात करून त्याने राष्ट्रीयस्तरावर संपादित केलेले यश कौतुकास्पद आहे. 

आई-वडीलांचे आशिर्वाद, गुरुजनांचे मार्गदर्शन यासोबत कठीण परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्याने आयआयटीचा मार्ग सुकर केला असून, भौतिक सुविधांच्या अभावामुळे अभ्यासात टाळाटाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो आदर्श ठरला आहे. एकूण काय, तर कुशल खलाशी होण्यासाठी खवळलेल्या सागरातही सफर केलीच पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com