गुजरातच्या बोंडअळीला अकोल्याचा ‘ट्रॅप’

अनुप ताले 
मंगळवार, 28 मे 2019

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या ‘सोलर ट्रॅप’ची मागणी देशभरातून व्हायला लागली आहे.

अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या ‘सोलर ट्रॅप’ची मागणी देशभरातून व्हायला लागली आहे. गुजरात कृषी उद्योगाने नुकतीच तशी मागणी डॉ. पंदेकृविकडे केली असून, लवकरच संपूर्ण गुजरातमध्ये या ‘सोलर ट्रॅप’ची उभारणी केली जाणार आहे. 

देशात सर्वाधिक कापूस उत्पादन गुजरातमध्ये घेतले जाते व कापड उद्योगासाठीसुद्धा राज्याची जगभरात ओळख आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही कापूस उत्पादन व उद्योग वाढत आहे. मात्र दोन्ही ठिकाणी कापूस उत्पादनासाठी गुलाबी बोंडअळी डोकेदुखी ठरत असून, तिच्या प्रादुर्भावामुळे गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रातील कापूस उत्पादनही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे.

यावर उपाय म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कुलगुरू डॉ.विलास भाले यांच्या मार्गदर्शनात व अपारंपरिक उर्जास्त्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ.सुरेद्र काळबांडे यांच्या प्रयत्नातून सोलर ट्रॅप या स्वयंचलित टेक्नॉलाॅजीची निर्मिती केली. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात व अल्पावधीत गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविणे शक्य होत आहे. या टेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर केल्यास गुलाबी बोंडअळीला समूळ नष्ट केले जाऊ शकते, ही बाब लक्षात आल्याने, गांधीनगर येथील ‘गुजरात इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड’द्वारे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे सोलर ट्रॅपची मागणी केली असून, संपूर्ण गुजरातमध्ये शेतकऱ्यांना त्यांचे वाटप केले जाणार आहे. 

गुलाबी बोंडअळीवर नियत्रंण मिळविण्यासाठी ‘गुजरात इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (गुजरात कृषीउद्योग) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला पत्र पाठवून ‘सोलर ट्रॅप’ची मागणी केली आहे. एका एजन्सीजमार्फत या ट्रॅपचा पुरवठा केला जाईल. त्यातून पाच टक्के रॉयल्टी विद्यापीठाला मिळणार आहे. आजपर्यंत विद्यापीठाला दुसऱ्यांच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा लागत होता, आता मात्र विद्यापीठाची टेक्नॉलॉजी इतर राज्यात वापरली जात आहे, ही आनंदाची बाब आहे. 

- डॉ.विलास भाले, कुलगुरू, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. 

कुलगुरू डॉ.विलास भाले यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनात गेल्यावर्षी ‘सोलर ट्रॅप’ची विभागाने निर्मिती केली. सध्या या टेक्नॉलॉजीची मागणी वाढत असून, गुजरातकडूनही त्याची मागणी झाली आहे. त्याच्या एमएयू संदर्भात मी अहमदाबाद येथे आलो असून, मंगळवारी (ता.२८) त्याबाबत निर्णय होईल. 

- सुरेंद्र काळबांडे, अपारंपरिक उर्जास्त्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभाग प्रमुख, डॉ.पंदेकृवि. 

असा आहे सोलर ट्रॅप 

विद्यापीठाद्वारे निर्मित सोलर ट्रॅपमध्ये ५ व्हॅटचा यूव्ही लाईट असून, तो आॅपरेट करण्यासाठी १० व्हॅटचे सोलर पॅनेल लावले आहे. दिवसापॅनलद्वारे बॅटरी चार्ज होते व लावलेल्या इलेक्ट्रॉनिक सक्रिटच्या टायमिंगनुसार सायंकाळी ६ ते रात्री १० व सकाळी ४ ते ६ या वेळेत अॉटोमॅटीक लाईट सुरू होतो. दहा फुटापर्यंत या ट्रॅपची उंची कमी जास्त केली जाऊ शकते. दोन एकरात एक ट्रॅप काम करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akolas Trap for Gujarats Bond Ali