सोने खरेदीला ‘अक्षय्य’ गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नागपूर - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शहरातील  सराफ बाजार गर्दीने लखलखला. सोन्याचे भाव चढे असले तरी मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रीघ लागली होती. त्यामुळे दिवसभरात सराफ बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. 

नागपूर - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शहरातील  सराफ बाजार गर्दीने लखलखला. सोन्याचे भाव चढे असले तरी मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रीघ लागली होती. त्यामुळे दिवसभरात सराफ बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. 

अक्षय्य तृतीया हा सोने खरेदीसाठी उत्तम मुहूर्त समजला जातो. या दिवशी घेतलेले सोने अक्षय्य म्हणजेच वृद्धिंगत होणारे ठरते. त्यामुळे या मुहूर्तावर सोने घेण्याची परंपरा आहे. त्यादृष्टीने सराफ व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती आणि योजना जाहीर केल्या होत्या. त्यात दागिन्यांच्या मजुरीवर सूट, लकी ड्रॉ, सोनेखरेदीवर चांदी मोफत या  सवलतींचा समावेश होता. सराफ बाजारासह नामांकित दुकांनामध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची अक्षरश:  झुंबड उडाली. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षात सोन्याच्या भावात होत असलेली वाढ पाहता सोन्यात गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे सोनेविक्रीची उलाढाल  कोट्यवधीत आहे. अनेक ग्राहकांनी लग्नासाठीची खरेदीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरच केली. सोन्याचा भाव आज ३२ हजार १०० रुपये प्रतितोळा होता. दर वाढले असले तरी त्याचा परिणाम खरेदीवर झाला नाही. त्यामुळे सराफ बाजारात चैतन्याचे वातावरण होते. लग्नसराईचे दिवस असल्याने अनेकांनी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत सोने खरेदी केली.  

दुपारचे ऊन आणि पूजेच्या वेळेमुळे एक ते तीनदरम्यान दुकानांमध्ये कमी गर्दी होती. परंतु, दुपारनंतर सुरू झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. ग्राहकांनी एक ग्रॅम सोन्यापासून ते लग्नसोहळ्यासाठी लागणारे दागिने, बांगड्या, अंगठी, सोन्याची चेन आदी वस्तूंच्या खरेदीवर भर दिला.  

बॅंकेत नोटांचा तुटवडा असल्याने शहरातील अनेक एटीएममध्ये ठणठणाट होता. त्यामुळे ग्राहकांनी यंदा रोख रक्कम देण्याऐवजी धनादेश आणि विविध कार्डच्या साहाय्याने खरेदी केली.
राजेश रोकडे, संचालक, रोकडे ज्वेलर्स

Web Title: Akshaya Tritiya gold shopping full

टॅग्स