मद्यपी पोलिसांनो... सावधान!

अनिल कांबळे 
गुरुवार, 13 एप्रिल 2017

तुमच्यावर होऊ शकते निलंबनाची कारवाई

तुमच्यावर होऊ शकते निलंबनाची कारवाई
नागपूर - ऑन ड्यूटी मद्यप्राशन करून खाकीची प्रतिमा मलिन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनो सावधान... आता ऑनड्यूटी "लाइट किंवा टाइट' आढल्यास थेट निलंबनाची कारवाई होणार आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी उपायुक्‍त कार्यालयातील एका पोलिस कर्मचारी लिपिकाला ड्यूटीवर दारू पिऊन येणे चांगलेच भोवले. उपायुक्‍तांनी थेट अहवाल पाठविल्यानंतर त्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. या कारवाईचा अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी धसका घेतला असून कमीत कमी ऑनड्यूटी मद्यप्राशन करून ड्यूटीवर येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिस विभागाची "डिसीप्लीन फोर्स' अशी ओळख आहे. अंगावर खाकी चढविलेल्या प्रत्येकांकडून शिस्तीची अपेक्षा सामान्य नागरिकांना असते. "सदरक्षणाय्‌ खलनिग्रहणाय' असे ब्रीदवाक्‍य पोलिस विभागाचे आहे.

त्यामुळे समाज व कायद्याचे संरक्षक म्हणून प्रत्येक खाकी वर्दीधारकांकडे पाहण्यात येते. मात्र, अनेकवेळा कुंपणच शेत खात असल्यामुळे पोलिस हे "रक्षक की भक्षक' असा प्रश्‍न निर्माण होता. अनेक पोलिस कर्मचारी स्वतःच कायद्याचे पालन करताना दिसत नाहीत.

दुचाकी चालविताना आजही अनेक पोलिस कर्मचारी हेल्मेट घालत नाहीत. ट्रीपल सीट, सिग्नल तोडणे, दारू पिऊन दुचाकी चालविणे इत्यादी करताना पोलिसच आढळतात. लाल दिवा असल्यामुळे वाहनधारक थांबलेले असताना अचानक कुणी वर्दीधारी दुचाकी घेऊन सिग्नल तोडतो, त्यामुळे पोलिसांकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदलतो. गेल्या शुक्रवारी उपायुक्‍त कार्यालयात कार्यरत लिपिकाला कर्तव्यात कसूर आणि मद्यप्राशन करून कर्तव्यावर हजर झाल्यामुळे निलंबित करण्यात आले. तसेच अनेक महाभाग पोलिस ठाण्यात किंवा शाखेतच दारू पिऊन येतात. नाकाबंदी करून "ड्रंकन ड्राईव्ह' वाहतूक पोलिसच दारू पिऊन असल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र, आता कर्तव्यावर मद्यप्राशन करून आढल्यास थेट निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

पोलिस विभागाला व्यसनांची "कीड'
पोलिस विभागातील काही अधिकारी आणि जवळपास 80 टक्‍के पोलिस कर्मचारी व्यसनाधीन आहेत. दारू, तंबाखू, खर्रा, पान, बिडी-सिगारेट असी व्यसन आहेत. खर्रा खाणारे पोलिस कर्मचारी प्रत्येकच पोलिस ठाण्यात पहायला मिळतात. ठाण्याच्या अर्ध्याअधिक भींती पोलिस कर्मचारी खर्राच्या पिचकारीने रंगवतात.

पोलिसांना समुपदेशनाची गरज
हुडकेश्‍वर ठाण्याचे निरीक्षक सुनील झावरे यांनी "निर्व्यसनी खाकी' नावाने उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या ठाण्यातील एकही पोलिस कर्मचारी खर्रा, पान, सिगारेट किंवा दारू पित नाहीत. अनेकांना समूपदेशन आणि मार्गदर्शन करून त्यांनी निव्यर्सनी पोलिस स्टेशन निर्माण केले आहे. अशाच प्रकारचे समूपदेशन अन्य ठाण्यात करण्याची गरज आहे.

पोलिस खात्यात शिस्तीला खूप महत्त्व आहे. नागरिकांची सुरक्षा हे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे कर्तव्यावर असताना कसूर करणे किंवा मद्यप्राशन करणे हे मुळीच खपवून घेतले जाणार नाही. अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. "एन-कॉप्स' प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण आणि मार्गदर्शन प्रत्येक कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असून येथेही याबाबत समुपदेशन करण्यात येईल.
-डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्‍त

Web Title: alcoholic police alert