भाजप कार्यकर्त्याच्या खुनाच्या निषेधार्थ रुग्णवाहिका पेटविली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

आर्णी (जि. यवतमाळ) : भाजपचा कार्यकर्ता असलेल्या नीलेश मस्केचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी ग्रामीण रुग्णालयासमोरील बागोरी संकुलासमोर घडली. नीलेश गंभीर जखमी असताना उपचारार्थ हलविण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याचा संताप व्यक्त करीत मध्यरात्री ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका पेटविली. याच घटनेच्या निषेधार्थ आज (ता. 15) शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.

पैशाच्या वादातून नीलेश मस्के (वय 35, रा. बालाजीपार्क) याच्यावर बागोरी संकुलासमोरील रस्त्यावर चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती, तर नीलेश बचावला असता, असा रोष व्यक्त करीत मध्यरात्री जमावाने रुग्णवाहिका पेटवून दिली. शिवाय ग्रामीण रुग्णालयासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. आगीत रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली. या प्रकरणाची तक्रार आर्णी पोलिस ठाण्यात देण्यात आली. वृत्त लिहीपर्यत कुठलाही गुन्हा नोंद झाला नव्हता. तसेच रुग्णवाहिका जाळणारे कोण, त्यांचीही नावे कळू शकली नाही. शनिवारी (ता. 15) दुपारी बारा वाजता नीलेशची अंत्ययात्रा बालाजीपार्क येथील राहत्या घरून निघाली. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्याच्यावर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील चौकाचौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Ambulance lit up by protesting against the murder of the BJP worker