"झुंड'च्या शुटिंगसाठी महानायक नागपुरात दाखल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नागपूर : नागराज मंजुळे यांच्या "झुंड' चित्रपटाच्या शुटिंगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सकाळी नागपुरात दाखल झाले. ज्या परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे, तेथील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

नागपूर : नागराज मंजुळे यांच्या "झुंड' चित्रपटाच्या शुटिंगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सकाळी नागपुरात दाखल झाले. ज्या परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे, तेथील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

नागपुरातील झोपडपट्टी फुटबॉलचे जनक प्रा. विजय बारसे यांनी राबविलेल्या व नंतर "स्लम सॉकर' म्हणून जगात नावाजलेल्या उपक्रमावर आधारित "झुंड' चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. झोपडपट्ट्यांमध्ये असलेले युवक अनेकदा व्यसनाच्या आहारी जातात किंवा गुन्हेगारी टोळीमध्ये सामील होतात. या युवकांना गुन्हेगारी विळख्यातून बाहेर काढण्यासाठी झोपडपट्टी फुटबॉल हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनीही कौतुक केले होते. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांच्या "सत्यमेव जयते' या कार्यक्रमातही विजय बारसे सामील झाले होते. 

विजय बारसे यांच्या झोपडपट्टी फुटबॉल संकल्पनेवर आधारित नागराज मंजुळे चित्रपट काढीत असून नागपुरातील मोहननगर, डोबीनगर या झोपडपट्टींमध्ये या चित्रपटाचे काही चित्रीकरण होणार आहे. या चित्रपटात बारसे यांची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार आहेत. अमिताभ बच्चन आज चित्रीकरणात भाग घेणार की नाही, याबद्दल निश्‍चित माहिती नाही. येत्या काही दिवसांत ते चित्रीकरणात सहभागी होतील, असे समजते. या निमित्ताने अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण जवळून पाहण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे.

Web Title: Amitabh Bacchan in Nagpur for Zund movie shooting