अमलनाला धरण अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत; पर्यटकांची गैरसोय

दिपक खेकारे
Tuesday, 20 October 2020

यंदा मुसळधार पाऊस पडल्याने धरण तुडुंब भरले आहे. या धरणातील पाणी वेस्ट वेअरमधून बाहेर पडत असते. त्याठिकाणी पर्यटक गर्दी करतात. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या स्थळाला भेट देण्यासाठी एकदा आलेला पर्यटक परत या जागी येतोच.

गडचांदूर (जि. चंद्रपूर):  जिल्ह्यातील राजुरा, जिवती आणि कोरपना या तीन तालुक्यातील डोंगराळ भागात अमलनाला धरण आहे. या धरण परिसरातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी याठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. केवळ जिल्ह्यातीलच नाहीतर तेलंगाणा राज्यातील पर्यटक देखील याठिकाणी गर्दी करतात. मात्र, या परिसराचा अजूनही पर्यटन स्थळ म्हणून विकास झालेला नाही. त्यामुळे पर्यटकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

यंदा मुसळधार पाऊस पडल्याने धरण तुडुंब भरले आहे. या धरणातील पाणी वेस्ट वेअरमधून बाहेर पडत असते. त्याठिकाणी पर्यटक गर्दी करतात. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या स्थळाला भेट देण्यासाठी एकदा आलेला पर्यटक परत या जागी येतोच. धरणातून पडणाऱ्या पाण्याचा धबधब्यासारखा आनंद येथील पर्यटक घेत असतात. मात्र, भिजल्यानंतर महिलांना कपडे बदलण्याची सुविधा देखील याठिकाणी नाही. त्यांना कपडे बदलण्यासाठी झाडाझुडपांचा आधार घ्यावा लागतो.

हेही वाचा - काय आहे इकॉर्निया वनस्पती? कशी करते भूगर्भातील पाण्याची पातळी कमी?

अमलनाला धरणाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. कच्चा रस्ता आहे. मात्र, पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर चिखल तयार होते. त्यामधून वाहने चालवणे देखील अवघड होते. त्यामुळेच याठिकाणी अनेकांचे अपघात होतात. तसेच पर्यटक सोबत आणलेले खाद्यपदार्थ तिथेच टाकतात. त्यामुळे याठिकाणी प्लास्टिक, पेपर, बाटल्या यांसारख्या कचऱ्याचा ढिग साचलाय. त्यासाठी कचरा कुंड्यांची गरज आहे. मात्र, विकासाअभावी ते देखील याठिकाणी दिसून येत नाही.

परिसरातील पर्यटन स्थळे -

माणिकगढ किल्ला -
गोंड राजाच्या राजवटीपासून अस्तित्वात असलेला माणिकगढ किल्ला आजही याठिकाणी अगदी दिमाखात उभा आहे. हे गडचांदूर शहराचे प्रतीकच आहे. माणिकगढ किल्ल्याच्या जीवंत भिंती, तोफा, विहिरी हे सर्व काही आजही याठिकाणी पाहायला मिळते.

हेही वाचा - बिल भरा अथवा वीज कापू; वीज कर्मचाऱ्यांकडून धमक्या,...

विष्णू मंदिर -
पुरातन काळातील एकाच दगडावर कोरलेले विष्णू मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. माणिकगढ सिमेंटच्या पायथ्याशी हे मंदिर असून दर्शनासाठी दररोज अनेक भाविकांची रांग लागलेली असता. चारही बाजूने हिरवीगार चादर ओढलेल्या विष्णू मंदिरात एकदा प्रवेश केला की बाहेर निघायची इच्छा होत नाही.  

शिव मंदिर -
गडचांदूर येथे प्रसिद्ध शिवमंदिर आहे. याठिकाणी नवस बोलल्यास पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे याठिकाणी नेहमी भाविकांची गर्दी असते. तसेच शिवमंदिर उंचावर असल्याने अमलनाला धरणाचे सौंदर्य टेकडीवरून अतिशय सुंदर दिसते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amlanala dam need to develop as a tourist spot in chandrapur