असे झालेच कसे, माहिती शेअर न करताही 61 हजारांनी लुबाडले, शिक्षकाची तक्रार

संतोष ताकपिरे 
Thursday, 24 September 2020

21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2020 असे तीन दिवस त्यांच्या खात्यातील पैशांचा टप्प्याटप्याने वापर झाला. प्रफुल्ल बाबरे यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या बॅंक खत्याच्या डिटेल्स तपासल्या असता दोन ते तीन कंपन्यांकडे त्यांचे पैसे वळते झाल्याचे लक्षात आले.

अमरावती  ः दोन दिवसांत शहरातील दुसऱ्याही एका शिक्षकाने बचतखात्यासह क्रेडिट कार्डची माहिती शेअर केली नसताना त्याच्या बॅंक खात्यामधून कुणीतरी परस्पर 61 हजार 254 रुपयांचा आर्थिक व्यवहार करून पैसे लुबाडले. प्रफुल्ल रमेश बाबरे (वय 49, रा. सामनानगर, अमरावती) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते व्यवसायाने शिक्षक असल्याचे आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी सांगितले.

21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2020 असे तीन दिवस त्यांच्या खात्यातील पैशांचा टप्प्याटप्याने वापर झाला. प्रफुल्ल बाबरे यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या बॅंक खत्याच्या डिटेल्स तपासल्या असता दोन ते तीन कंपन्यांकडे त्यांचे पैसे वळते झाल्याचे लक्षात आले. तीन दिवसांतील व्यवहाराच्या बऱ्याच एन्ट्री दिसत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु तक्रारकर्ते श्री. बाबरे यांच्या मते त्यांनी कुणालाही बचतखात्याची किंवा क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती शेअर केली नाही. 

सविस्तर वाचा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर
 

पोलिसांच्या मते कुणासोबत तरी गोपनीय माहिती शेअर केल्याशिवाय छोट्या-छोट्या रकमेचे व्यवहार कसे झाले? असा प्रश्‍न आता तपास अधिकाऱ्यांना पडलाय. दोन दिवसांपूर्वीही एका शिक्षकाने चुकीच्या कस्टमर केअर नंबरवर संपर्क साधल्यामुळे त्यांच्या खात्यातून 39 हजारांची रक्कम लुबाडल्या गेली होती. 

पेच सोडविण्यासाठी चौकशी होईल
सायबर क्राईमसाठी खाते हॅक केले तर एक किंवा दोन टप्प्यात तो रक्कम हडपतो. असे आजवरच्या घटनांवरून दिसून येते. या प्रकरणातील पेच सोडविण्यासाठी चौकशी केली जाईल.
-रवींद्र सहारे, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे.

 
पतीला सुपारी देऊन मारण्याची महिलेस धमकी

विवाहितेची छेडखानी करून पतीला मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी संशयित आरोपी जियाउल्लाह अताउल्हा याच्याविरुद्ध विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पीडित महिला रस्त्याने घराकडे जाण्यास निघाली. त्यावेळी जियाउल्लाह याने शिवीगाळ करून अश्‍लील वर्तन करून छेडखानी केली व त्याने पीडितेच्या पतीला सुपारी देऊन मारण्याची धमकी दिली. रस्त्यात छेडखानी, त्यानंतर पतीला मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या स्थितीत ती घरी पोहोचली. पतीला दुसऱ्या दिवशी घटनेची माहिती दिली. पीडितेच्या तक्रारीवरून नागपुरीगेट पोलिसांनी संशयित आरोपी जियाउल्लाविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारपर्यंत (ता. 24) त्याला अटक झाली नसल्याचे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी सांगितले.

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amount transferred online from bank account, report to police