अमरावती होत आहे निवृत्तांचे शहर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

अमरावती : अमरावतीत रोजगाराची साधने नसल्याने उच्चशिक्षण घेतल्यावर येथील तरुणाईची ओढ पुणे, नाशिक, मुंबई तसेच अन्य महानगरांकडे असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांचे पालक येथेच राहत असल्याने येत्या काही वर्षांमध्ये अमरावती हे निवृत्तांचे शहर होण्याचा धोका वाढला आहे.

अमरावती : अमरावतीत रोजगाराची साधने नसल्याने उच्चशिक्षण घेतल्यावर येथील तरुणाईची ओढ पुणे, नाशिक, मुंबई तसेच अन्य महानगरांकडे असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांचे पालक येथेच राहत असल्याने येत्या काही वर्षांमध्ये अमरावती हे निवृत्तांचे शहर होण्याचा धोका वाढला आहे.
अमरावतीत आठ नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच पॉलिटेक्‍निक व अन्य तांत्रिक महाविद्यालये आहेत. अभियांत्रिकी, फार्मसी, मेडिकलसह अन्य शाखांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या माध्यमाने प्रवेश मिळावा यासाठी सुमारे 500 च्या वर खासगी शिकवणीवर्गाचे जाळेसुद्धा शहरात आहे. असे असले तरी उच्चशिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या कोणत्याच संधी अमरावतीत नसल्याची गंभीर स्थिती आहे. नांदगावपेठच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत टेक्‍स्टाईल झोनच्या पायाभरणीने येथील युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न काही प्रमाणात तरी निकाली निघेल असे बोलले जात होते. परंतु प्रत्यक्षात तसे काहीही घडलेले नाही. उच्चशिक्षितांना येथे योग्य पद्धतीने वेतन दिले जात नसल्याने युवकच नव्हे तर युवतींनी सुद्धा अन्य महानगरांची वाट धरली आहे. निवृत्तांचे आयुष्य जगणाऱ्या त्यांच्या पालकांना आपले घर सोडावेसे वाटत नाही. त्यामुळे ते अमरावतीतच आहेत. हीच स्थिती कायम राहिली तर अमरावती हे निवृत्तांचे शहर होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे शासन तसेच लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी उद्योगांचे जाळे विणणे आवश्‍यक झाले आहे. उद्योगवाढीचा वेग अतीशय जास्त असणे गरजेचे आहे.
शहरातील एमआयडीसीमध्ये सध्या असलेले निवडक उद्योग सोडले तर अन्य उद्योगांची अवस्था बिकट आहे. विविध स्वरुपाच्या करांच्या ओझ्याखाली हे उद्योग दबले असून अनेक ठिकाणी उद्योग बंद करून गोदाम तयार करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतल्याची माहिती आहे.
ऑटोमोबाईल, आय.टी हब हवा
ऑटोमोबाईल, आय.टी, इंडीनियरींगचे युनिट अमरावतीत आणण्यासाठी त्या पद्धतीच्या धोरणाची गरज आहे. सरकारने त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कारण स्थानिक उद्योजक एवढ्या मोठ्या प्रमाणात भांडवल उभे करू शकत नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati is becoming a city of retirees