esakal | मोबाईलचा अतिवापर घातक : अश्लील चित्रफीत बघून चिमुरडीवर अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईलचा अतिवापर घातक : अश्लील चित्रफीत बघून चिमुरडीवर अत्याचार

मोबाईलचा अतिवापर घातक : अश्लील चित्रफीत बघून चिमुरडीवर अत्याचार

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : अभ्यासाच्या नावाखाली अल्पवयीन मुलांना दिलेले अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम करीत असल्याचे दिसून येत आहे. दहाव्या वर्गात शिकणाऱ्या पंधरा वर्षाच्या मुलाने अश्लील चित्रफीत बघून सात वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. (Amravati-Crime-News-Atrocities-on-Small-Girl-Bad-Film-nad86)

शहरातील राजापेठ ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध अत्याचार, अनैसर्गिक कृत्यासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनामुळे शिकवणीवर्ग आणि शाळा ऑनलाइन सुरू आहेत. बहुतांश पालकांनी त्यामुळे मुलांना अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल घेऊन दिले. मुलगा दहावीत गेल्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या एका पालकाने अभ्यासासाठी नुकताच मुलाला अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल विकत घेऊन दिला.

हेही वाचा: हवामान तज्ज्ञांनी पावसाबाबत दिले संकेत; चिंता वाढणार की कमी होणार?

ऑनलाइन क्लास सुरू असताना काही अश्लील जाहिरातीच्या क्लिप व फोटो झळकत असतात. सतत मोबाईल हातात असल्याने कळत-नकळत त्याकडे मुलांचे लक्ष जाते. एकदा अश्लील क्लिप बघितल्यानंतर अनेकांना तशी सवय लागते. या मुलाने अश्लील चित्रफीत बघून एका सात वर्षांच्या मुलीला एका अपार्टमेंटच्या खाली नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या भावाने हा प्रकार बघितला. पालकांना माहिती दिली. तातडीने पालकांनी राजापेठ ठाणे गाठून तक्रार दिली असता अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल देणे गरजेचे झाले. परंतु, आपल्या पाल्याने गैर बघू नये म्हणून त्यांना मार्गदर्शन करणे ही पालकांची जबाबदारी आहे. मोबाईलची तपासणी अधूनमधून करायलाच हवी.
- अ‍ॅड. सोनाली क्षीरसागर, सहायक सरकारी अभियोक्ता, अमरावती

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

याप्रकरणात पीडित चिमुरडीची वैद्यकीय तपासणी झाली. अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. चौकशी केली असता त्याने अश्लील चित्रफीत बघून गैरकृत्य केल्याची कबुली दिली.
- प्रशाली काळे, सहायक पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे

(Amravati-Crime-News-Atrocities-on-Small-Girl-Bad-Film-nad86)

loading image