रुग्णांच्या मृत्यूने हादरला अमरावती जिल्हा; तीस दिवसांत १२३ मृत्यू

क्रिष्णा लोखंडे
Wednesday, 3 March 2021

फेब्रुवारी महिन्यात कोरोना संक्रमणाचा स्फोट झाला होता. या महिन्यातील २८ दिवसांत ९४ बाधितांचा मृत्यू झाला. मार्च महिन्याच्या प्रारंभीच कोरोनाने पहिल्या तीन दिवसांतच २९ जणांना आपल्या कवेत घेतले आहे.

अमरावती : कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या मृत्यूसंख्येने आरोग्ययंत्रणेसह जिल्हा प्रशासनासमोरील चिंता चांगलीच वाढली आहे. एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदर कमी दिसत असला तरी दररोज मृत्यू पावणाऱ्यांचा आकडा मात्र धडकी भरविणारा ठरू लागला आहे. गतवर्षी सप्टेंबर हा मृत्यूचे तांडव घालणारा महिना ठरला होता. त्या तुलनेत फेब्रुवारीत कमी मृत्यू झाले आहे. फेब्रुवारीतील २८ व मार्चमधील तीन अशा एकतीस दिवसांत १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

फेब्रुवारी महिन्यात कोरोना संक्रमणाचा स्फोट झाला होता. या महिन्यातील २८ दिवसांत ९४ बाधितांचा मृत्यू झाला. मार्च महिन्याच्या प्रारंभीच कोरोनाने पहिल्या तीन दिवसांतच २९ जणांना आपल्या कवेत घेतले आहे.

अधिक माहितीसाठी - ...तर अमरावतीत यापुढे लॉकडाउन नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत

त्यामुळे एकतीस दिवसांत मृत्यूचा आकडा १२३ वर पोहोचला. या कालावधीतील मृत्यूदर सरासरी प्रतिदिवस तीनपेक्षा अधिक आहे. गेल्या एकतीस दिवसांत मृत्यू झालेल्या बाधित रुग्णांमध्ये पन्नास ते साठ वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या व्यक्तींचा समावेश तुलनेने अधिक आहे.

महापालिका क्षेत्रात ५५ जणांचा मृत्यू

महापालिकेच्या क्षेत्रात फेब्रुवारी महिन्यात २८ दिवसांत १० हजार १३६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यातील ५५ रुग्णांचा मृत्यू झाला. प्रतिदिवस मृत्यूदर हादरविणारा आहे. गतवर्षी सप्टेंबर महिना कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूने गाजला होता. महापालिका क्षेत्रात या महिन्यात चार हजार ७३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते व ८३ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

२० टक्के रुग्ण गंभीर

रोज सहाशे ते आठशे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यातील २० टक्के रुग्ण गंभीर वळणावरील असतात. त्यांना विविध आजार राहत असल्याने प्रतीकारशक्ती कमी असते. जीव वाचविण्याचेच प्रयत्न करण्यात येतात, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्‍यामसुंदर निकम यांनी सांगितले.

जाणून घ्या - पतीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार

कारणांचा शोध घेऊ

महिनाभरात मृत्यूचा आकडा का वाढला, याचे कारण शोधण्यात येणार आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्येही मृत्यूदर वाढला होता. मात्र, नंतर कमी झाला. यावेळी अचानक दर वाढण्यामागे वयोमान व त्यांना असलेले आजार हे कारण असू शकते, तरी कारणमिमांसा केली जाईल, असे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati district shaken by patients death 123 deaths in thirty days