पहाटे लागलेल्या आगीने धारण केले रौद्ररूप आणि झाले हे नुकसान...

दिनकर सुंदरकर
शनिवार, 4 एप्रिल 2020

नागरिकांनी आपापल्या परीने आग विझवायला सुरुवात केली. अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी पोहोचले व आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीत सर्वच दुकाने जळून खाक झाली होती. 

अमरावती : अचानक लागलेल्या आगीत पोलिस चौकीसह आठ दुकाने जळून खाक झाल्याची घटना शनिवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ येथील शिवाजी महाराज चौकात घडली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या भीषण आगीमध्ये जवळपास पंधरा लखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेने गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. घात की घातपात असा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे. सदर जागा ग्रामपंचायतच्या मालकीची आहे, हे विशेष... 

येथील शिवाजी महाराज चौक येथे पोलिस चौकीसह उमेश गणोरकर यांचे चप्पल दुकान, ज्ञानेश्‍वर गणोरकर यांचे ढोलकी दुरुस्तीचे दुकान, अंबादास इंगळकर यांचे केस कर्तनालय, रवींद्र डोंगरे यांचे घड्याळ दुकान, सचिन ढोबरे यांचे मोटार दुरुस्तीचे दुकान, गजानन भाकरे यांचे मोबाईल रिचार्ज दुकान, प्रताप देशमुख यांची पानटपरी, नारायण बेहरे यांची चहाचे दुकान आहेत. सध्या संचारबंदी असल्याने सर्व दुकाने बंद अवस्थेत आहेत. 

महत्त्वाची बातमी - नवलचं की! महाराष्ट्रातील हा जिल्हा आहे 'कोरोना'मुक्‍त, आढळलाच नाही पॉझिटिव्ह रुग्ण

शनिवारी पहाटे अचानक याठिकाणी आग लागली व अवघ्या काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. पहाटे चार वाजताच्या दरम्यान येथील काही भाजी विक्रेते अमरावतीकडे वाहनाने जात असताना त्यांना ही आग दिसली. त्यांनी लगेच पोलिस, अग्निशमन व इतर नागरिकांना घटनेची माहिती दिली. नागरिकांनी आपापल्या परीने आग विझवायला सुरुवात केली. अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी पोहोचले व आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीत सर्वच दुकाने जळून खाक झाली होती. 

आगीत उमेश गणोरकर यांचे तीन लाख, ज्ञानेश्‍वर गणोरकर यांचे चार लाख, रवींद्र डोंगरे यांचे दीड लाख, सचिन ढोबरे यांचे साडेतीन लाख, अंबादास इंगळकर यांचे पन्नास हजार, गजानन भाकरे यांचे पन्नास हजार, प्रताप देशमुख यांचे चाळीस हजार, नारायण बेहरे यांचे दहा हजारांचे साहित्य तसेच पोलिस चौकी जळून जवळपास पंधरा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. 

घटनेची माहिती मिळताच सरपंच दिगंबर आमले, ग्रामविकास अधिकारी जयश्री गजभिये, पोलिस निरीक्षक दिलीप चव्हाण, तलाठी रूपेश पाठक, मंडळ अधिकारी धोटे यांच्यासह सर्व कर्मचारी हजर झाले होते. घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून, हा घात आहे की अपघात याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. परंतु, आग कशामुळे लागली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा - जीवनावश्‍यक असल्याने सुरू होते किराणा दुकान; पत्नी गेली पतीच्या मदतीला अन्‌ मुलगा...

बजरंग दलाची प्रत्येकी दोन हजारांची मदत

आगीत ज्या व्यावसायिकांचे नुकसान झाले त्यांना मानवतेच्या आधारावर बजरंग दल विभाग संयोजक संतोषसिंह गहरवार यांनी तातडीने प्रत्येकी दोन हजार रुपयांची रोख आर्थिक मदत दिली. यावेळी ऍड. नीलेश मरोडकर, मंगेश तायडे, अनिल हिवे, अतुल राजगुरे हे उपस्थित होते. 

शासकीय मदतीची अपेक्षा

आगीत जी दुकाने खाक झाली त्यांचा चरितार्थ या व्यवसायाच्या भरवशावर अवलंबून होता. सध्या संचारबंदीमुळे पंधरा दिवसांपासून सर्व दुकाने बंद होती. सर्व व्यावसायिक आर्थिक संकटांचा सामना करीत असताना आगीमुळे झालेल्या नुकसानाने व्यावसायिक खचले आहेत. त्यामुळे शासनाने मदत घ्यावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati fire burns eight shops and police station