नवलचं की! महाराष्ट्रातील हा जिल्हा आहे 'कोरोना'मुक्‍त, आढळलाच नाही पॉझिटिव्ह रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

जिल्ह्यातून अनेकजण वर्धेत आल्याचे पुढे येत आहेत. ते कसे हा संशोधनाचा विषय असला तरी त्यांचा शोध आरोग्य विभागाकडून घेत आहे. तशी माहिती आरोग्य विभागाला मिळताच त्यांना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. 

वर्धा : राज्यात कोरोना विषाणूने अनेक जिल्ह्यांना ग्रासले आहे. यात वर्धा मात्र अपवाद ठरत आहे. वर्ध्यात या संसर्गाच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. वर्ध्यातून आतापर्यत 52 संशयितांचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी 50 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तोही निगेटिव्ह असल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्‍वास घेतला आहे. दोन नमुने नियमात बसत नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

राज्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे पुढे येताच जिल्हा प्रशासन कामाला लागले. तसेच आरोग्य यंत्रणा सज्ज झाली. प्रारंभी परदेशातून आलेल्यांवर पाळत ठेऊन त्यांना त्यांच्याच घरी विलगीकरणात ठेवण्यात आले. जिल्ह्यात परदेशातून आलेल्यांची संख्या 114 आहे. त्यांचा विलगीकरणाचा काळ संपला असून, त्यांना मेकळे करण्यात आले आहे. ते आता सर्वसामान्यांप्रमाणे आपल्या कामात व्यस्त असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कसं काय बुवा? - या शहरात तीन दिवसांत एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही, मात्र ताण कायम...

बाहेर देशातून आलेल्यांकडून जिल्ह्यात हा संसर्ग न आल्याने एकही रुग्ण आढळून आलेला नाही. परंतु, जिल्ह्याच्या सीमा बंद असतानाही कोरोना विषाणू असलेल्या जिल्ह्यातून अनेकजण वर्धेत आल्याचे पुढे येत आहेत. ते कसे हा संशोधनाचा विषय असला तरी त्यांचा शोध आरोग्य विभागाकडून घेत आहे. तशी माहिती आरोग्य विभागाला मिळताच त्यांना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. 

पतीबद्दल पत्नीनेच दिली पोलिसांना माहिती

मुंबईवरून आलेला व्यक्ती आष्टी तालुक्‍यातील एका गावात त्याच्याच घरी आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार विलगीकरणात राहत होता. परंतु, गुरुवारी (ता. दोन) रात्रीच्या सुमारास पतीला त्रास होऊ लागला. यावर कोणाचीही तमा न बाळगता पत्नीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लागलीच ही माहिती आरोग्य विभागाला दिली. त्याला लगेच रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर काय ते सत्य कळेल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी दिली.

जाणून घ्या - दोनवेळा पुढे ढकलला विवाहसोहळा, तिसऱ्या मुहूर्ताला वधूने घेतला हा निर्णय...

बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या 12,459

वर्धेत बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. सध्या त्यांची संख्या 12 हजार 459 वर पोहोचली आहे. असे असले तरी इतरांचा शोध सुरू आहे. या सर्वांना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यापैकी 3733 जणांचा विलगीकरणाचा काळा पूर्ण झाला असून त्यांना मुक्त करण्यात आले आहेत. तर आठ हजार 626 जण अद्यापही विलगीकरणात आहे. त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no Corona-positive patient in Wardha district