उत्तराखंड येथील अपघातात अमरावतीच्या चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

माजी नगराध्यक्षांसह सहा गंभीर
अमरावती - केदारनाथ यात्रेला जाणारी टेम्पो ट्रॅक्‍स उत्तराखंड राज्यातील टिहरी जिल्ह्यात खोल दरीत कोसळली. अपघातात अमरावती जिल्ह्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, धामणगावच्या माजी नगराध्यक्षांसह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. चंगोरातील लांबगाव-कोटलगाव चामिया मार्गावर दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात घडला.

माजी नगराध्यक्षांसह सहा गंभीर
अमरावती - केदारनाथ यात्रेला जाणारी टेम्पो ट्रॅक्‍स उत्तराखंड राज्यातील टिहरी जिल्ह्यात खोल दरीत कोसळली. अपघातात अमरावती जिल्ह्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, धामणगावच्या माजी नगराध्यक्षांसह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. चंगोरातील लांबगाव-कोटलगाव चामिया मार्गावर दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात घडला.

मृतांमध्ये चंद्रकांत सीताराम काळकर (वय 61), कुंदादेवी चंद्रकांत काळकर (वय 50), मीना सुधाकर मोरारे (वय 48 तिघेही रा. विद्युतनगर, अमरावती) व संजय पाटील (वय 57, रा. वसुंधरा कॉलनी, अमरावती) यांचा समावेश आहे. गंभीर जखमींमध्ये धामणगाव नगर परिषदेच्या माजी नगरध्यक्ष अर्चना राऊत, सतीश राऊत, सुधाकर मोरारे, आर्या राऊत, पौर्णिमा वैभव यांचा समावेश आहे. मृतांमधील चंद्रकांत काळकर आणि कुंदादेवी काळकर हे नातलग असल्याची माहिती आहे. दोन्ही कुटुंबे चार दिवसांपूर्वी चारधाम यात्रेकरिता निघाली होती. दोन दिवसांपूर्वी ते केदारनाथ यात्रेकरिता उत्तराखंड राज्यात पोहोचले होते. आज, शनिवारी चारधाम यात्रेकरूंना घेऊन जाणारी एच. आर. 69 बी. 2718 क्रमांकाची टेम्पो ट्रॅव्हल्स दुपारी बाराच्या सुमारास दरीत कोसळली. स्थानिक ग्रामस्थांनी अपघातातील जखमी व मृतांना खोल दरीतून बाहेर काढले. घनसाली पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल होईस्तोवर ग्रामस्थांनी सर्वांना बाहेर काढले होते. हे सर्व यात्रेकरू गंगोत्रीहून केदारनाथ येथे दर्शनासाठी जात होते.

जखमींवर टिहरीजवळील बलेश्‍वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी गंभीर जखमी झालेल्या दोघांना हवाई ऍम्बुलन्सने डेहराडूनजवळील जॉलीग्रॅंट रुग्णालयात आणले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ब्रेक फेल झाल्याने अपघात
लांबगाव-कोटालगाव हा मार्ग दऱ्याखोऱ्यांनी भरलेला आहे. अपघाताची चौकशी केली जात असली, तरी प्राथमिक माहितीनुसार वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे दिसून येते, अशी माहिती टिहरीचे सहायक पोलिस अधीक्षक एन. एस. नापालछायल यांनी दिली. जखमी झालेला वाहनचालक शाहनवाज हुसेन यानेही वाहनाचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून सानुग्राह मदत जाहीर
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्‍त केले असून मदतीची घोषणा केली आहे. मृतांच्या नातेवाइकांना 1 लाख, तर गंभीर जखमींना 50 हजार व किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली.

Web Title: amravati four death in uttarakhand accident