esakal | अमरावती: धो-धो तरीही गतवर्षीपेक्षा कमीच, जिल्ह्यात आतापर्यंत 738 मिमी पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

धो-धो तरीही गतवर्षीपेक्षा कमीच, जिल्ह्यात आतापर्यंत 738 मिमी पाऊस

धो-धो तरीही गतवर्षीपेक्षा कमीच, जिल्ह्यात आतापर्यंत 738 मिमी पाऊस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमरावती: गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत 7 टक्के पाऊस कमी झाला आहे. मात्र बरसलेल्या पावसाने शेतपिकांची काही भागात नासाडी केली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे भरल्याने आगामी रब्बी हंगामातील सिंचनाची व पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटला आहे. आतापर्यंत 1 जून ते 13 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात 738 मिमी पाऊस झाला असून अपेक्षित पावसाच्या तुलनेत सरासरीने तो 85 टक्के आहे.

हेही वाचा: अचलपूर: मेळघाटातील मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांच्या टिप्स

यंदा मॉन्सून वेळेवर येणार, असा हवामान खात्याचा अंदाज चुकवत मॉन्सून वेळाने सक्रिय झाला. जून महिन्यात 145 मिमी पाऊस अपेक्षित केल्या जातो. यंदा त्या तुलनेत 182 मिमी (130 टक्के) कोसळला. गतवर्षी तो 189 मिमी झाला होता. 1 जून ते 30 ऑगस्ट या पावसाच्या कालावधीत प्रत्येक महिन्यात पावसाने संततधार धरली.

जुलैमधील पावसाने शेतपिकांची व जमिनीची सर्वाधिक हानी झाली. या तीन महिन्यांत 708 मिमी पाऊस अपेक्षित केल्या जातो. प्रत्यक्षात मात्र तो 558 मिमी म्हणजे 78 टक्के झाला. या कालावधीत संततधार व काही भागातील अतिवृष्टीने जमिनी खरडून जाण्यासह शेतातून पावसाच्या पाण्याचे पाट वाहिल्याने पिकांची हानी झाली.

पावसाळ्यातील अखरेच्या सप्टेंबर महिन्यातील पावसाने जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणाची पाणीपातळी 95 टक्क्यांवर गेल्याने विसर्ग करण्याची वेळ आली. मध्यम प्रकल्पातूनही विसर्ग करावा लागला तर लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झालेत. सप्टेंबर महिन्यात 66 मिमी पाऊस अपेक्षित असताना 180 मिमी पाऊस झाला.

मेळघाट कोरडेच

जिल्ह्यात मेळघाटातील धारणी व चिखलदरा ही दोन तालुके सर्वाधिक पावसाची आहेत. धारणी तालुक्यात 1067 मिमी पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत 657 मिमी (70 टक्के), चिखलदरा तालुक्यात 1395 मिमी पाऊस अपेक्षित असताना 708 मिमी (56 टक्के) झाला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. चिखलदरा पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची गर्दी वर्षभर राहते. उन्हाळ्यात मात्र पाण्याच्या टंचाइचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात पहाडातून कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद लूटण्यासाठी गर्दी करतात.

loading image
go to top