महानगरपालिका प्रशासनाला हवी अमरावतीकरांची साथ... तरच तुटेल कोरोनाची साखळी

Amravati NMC
Amravati NMC

अमरावती : चवथ्या लॉकडाउनमध्ये शहरात बाहेरून येणाऱ्या विशेषतः रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. शहरी भागातील वाढते संक्रमण बघता 13 मेपासून पुन्हा आरोग्य सर्वेक्षण प्रारंभ करण्यात आले असून 2242 संशयितांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले आहेत. संक्रमणाची साखळी तोडण्याकरिता महापालिका व जिल्हा आरोग्य यंत्रणेसोबतच नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.

शहरी भागात व इतरत्र बाहेरून येणारे नागरिक पाहता दक्षता म्हणून आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सातत्यपूर्ण सर्वेक्षण, तपासण्या, उपचार, जनजागृती या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अमरावती विद्यापीठ लॅब येथे स्थापित प्रयोगशाळेत तपासण्यांचा वेग वाढल्याने तपासणी व उपचाराला गती मिळाली आहे. महानगरपालिका क्षेत्रात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे, असे मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी सांगितले. मनपाने लालखडी, रॉयल पॅलेस, तखतमल श्रीवल्लभ होमिओपॅथीक कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज व मोदी हॉस्पीटल, बडनेरा या पाच ठिकाणी फिवर क्‍लिनिक सुरू केले असून 21 मेपर्यत 1533 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

मनपा क्षेत्रात 2867 क्‍वारंटाइन
मनपा क्षेत्रात 21 मेपर्यंत बाहेरगांवावरून आलेले 837 व कोरोनाबाधित रुग्णाच्या सहवासित व संपर्कात आलेले एकूण 2867 नागरिकांना क्‍वारंटाइन करण्यात आलेले आहे. यापूर्वी 200 परदेशी, 3398 बाहेरगांवावरून आलेले व बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले असे एकूण 3925 जणांना क्वारंटाइनमुक्त करण्यात आले. ताज पॅलेस, व्ही.एम.व्ही. गर्ल्स होस्टेल, आदिवासी मुलींचे वस्तीगृह नवसारी, निंभोरा, गव्हरमेंट पॉलिटेक्‍नीक, इंजिनिअरिंग कॉलेज व रॉयल पॅलेस या सात ठिकाणी क्‍वारंटाइन सेंटर उभारले आहे. 

2242 थ्रोट स्वॅबमध्ये 130 बाधित 
महापालिकेच्या आरोग्य पथकाने 4 पासून केलेल्या आरोग्य तपासणीत 21 मेपर्यंत 2242 थ्रोट स्वॅब घेण्यात आले असून त्यामध्ये 130 पॉझिटिव्ह व 1960 निगेटिव्ह आढळलेत. नमुने घेण्याकरिता महानगरपालिका शाळा, नागपुरी गेट येथे लॅब सुरू करण्यात आली आहे. कॉंन्टॅक्‍ट ट्रेसिंगकरिता आरोग्य कर्मचारी, ए .एन. एम., आशा, अंगणवाडी सेविका तसेच एनयुलएम विभाग व इतर विभागाची मदत घेण्यात येत आहे. 

नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित
कोरोना संसर्गाची साखळी न तुटल्यास भविष्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढण्याची शक्‍यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. त्यामुळे आपले कुटुंब, समाज सुरक्षित करण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य मिळणे खूप आवश्‍यक आहे. संयम, स्वनियंत्रणातूनच या साथीवर मात करता येईल यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com