‘गळाभेट’ने पाषाणभिंतींना पाझर

संतोष ताकपिरे 
रविवार, 2 जुलै 2017

अमरावती - पती-पत्नी दोघेही कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. परंतु, दृष्टी नसलेली मुलगी मात्र एकटीच परिस्थितीशी झगडत होती. एका सामाजिक संस्थेने तिला प्रोत्साहन दिले; त्या हिरकणीचा वाढदिवस कारागृह प्रशासनाने साजरा केला. शनिवारी (ता. १) बंदीजनांच्या मुलामुलींसाठी कारागृहातच गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात आईवडिलांसोबतच दगडी भिंतींच्या आत अंध मुलीचाही वाढदिवस आणि दहावी उत्तीर्णांचा सत्कारही केला गेला.

सोनू गजानन पारेकर (वय १६; रा. वाडी, जि. बुलडाणा) असे त्या मुलीचे नाव आहे. सद्य:स्थितीत तिने वर्ग अकरावीला शहरातील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. सोनू ही कुटुंबात सर्वांत लहान. तिघी बहिणी आणि एक भाऊ असे त्यांचे कुटुंब बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्‍यातील वाडी गावात राहत होते. घटना घडण्यापूर्वी पारेकर यांच्या दोन मुलींचे लग्न झालेले होते. २०१० मध्ये पारेकर यांच्या पत्नीची छेड काढल्यावरून त्यांचा गावातील श्रीकृष्ण इंगळे नामक व्यक्तीशी वाद झाला. त्यातूनच इंगळेचा खून झाला. त्या गुन्ह्यात गजानन पारेकर व पत्नी इंदूबाई या दोघांना २१ मे २०११ रोजी जन्मठेपेची शिक्षा झाली. २३ मे २०११ पासून पती-पत्नी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. आईवडिलांचे कृपाछत्र हरविल्याने मुलगा मावशीकडे पुण्यात शिकायला गेला. सोनूला अमरावतीच्या अंध विद्यालयात टाकण्यात आले. तिथे तिचे शालेय शिक्षण झाले. कालांतराने पुन्हा शिक्षणात खंड पडला. वऱ्हाड संस्थेने तिला शोधले. १७ नंबरचा परीक्षा अर्ज भरायला लावून अभ्यास करण्यास प्रोत्साहन देत तिला होलिक्रॉस शाळेच्या वसतिगृहात संस्थेने प्रवेश मिळवून दिला. अंध असलेली सोनू ६१ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. तिचा काल  (शनिवारी) वाढदिवस होता; पण तो साजरा करायला आईवडील वा रक्ताच्या नात्यातील कुणीही नव्हते. वाढदिवस साजरा होत नाही म्हणून तिने चिंताही केली नव्हती; मात्र कारागृहात असलेल्या आपल्या आईवडिलांची भेट तिच्यासाठी वाढदिवसाची अविस्मरणीय भेट ठरली. वर्ष-दीड वर्षाने आपल्या अंध आणि दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलीला बघून पारेकर दाम्पत्याच्या डोळ्यांत अश्रू तराळले.

Web Title: amravati news blind sonu parekar