'पैशापलीकडील माणुसकी जपणारी माणसे हवी'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

अमरावती - दुःखी, कष्टी माणसाच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याइतपत संवेदना मनात जागृत झाली पाहिजे, पैसे तर सारेच मिळवितात; मात्र पैशापलीकडे माणुसकी जपणारी मौल्यवान माणसे आज समाजात तयार झाली पाहिजेत. निःस्वार्थ सेवेचा परामोच्च आनंद मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी काल (ता. आठ) केले.

अमरावती - दुःखी, कष्टी माणसाच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याइतपत संवेदना मनात जागृत झाली पाहिजे, पैसे तर सारेच मिळवितात; मात्र पैशापलीकडे माणुसकी जपणारी मौल्यवान माणसे आज समाजात तयार झाली पाहिजेत. निःस्वार्थ सेवेचा परामोच्च आनंद मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी काल (ता. आठ) केले.

सकाळ डोनेट युवर बुकचा समारोपीय कार्यक्रम मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात शनिवारी (ता. आठ) आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक डॉ. भाईदास ढोले, उपाय फाउंडेशनचे संस्थापक वरुण श्रीवास्तव, न्यू गोल्डन इंग्लिश स्कूलचे संस्थापक अनिल आसलकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. स्मिता कोल्हे पुढे म्हणाल्या, मेळघाटमध्ये आम्ही काम सुरू केले त्यावेळी परिस्थिती फारच बिकट होती. अशा स्थितीत समाजसेवेचे व्रत घेऊन डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या मदतीने आज अनेकांना जीवनदान मिळाल्याचे समाधान आहे. मेळघाटात एकही मूल मरू नये हेच आमच्या अखेरच्या श्‍वासापर्यंत ध्येय राहील, असेही त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, त्यासाठीच शिकता शिकता कमविता आले पाहिजे, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी उपाय फाउंडेशनचे संस्थापक वरुण श्रीवास्तव म्हणाले, या जगात आज माणुसकीची मोठी उणीव भासू लागली असून समाजाने माणुसकीसाठी आता काम करण्याची गरज आहे. तळागाळातील लोकांना, फुटपाथवर जीवन व्यतित करणाऱ्या चिमुकल्यांना शिकविण्याची गरज ओळखून आम्ही ती सुरुवात केली. मात्र, मिशन आता कुठे सुरू झाले आहे. आज युवकांची चैतन्यमय ऊर्जा सकारात्मक कामांसाठी लावण्याची गरज आहे.

 देशाने युवकांची हीच शक्ती ओळखली पाहिजे, असेही ते म्हणाले. कारागृह अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांनी मध्यवर्ती कारागृहात बंदिजनांसाठी सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. अतिसंताप, लोभ, व्यसनाधीनता, अहंकार हे अवगुण सोडण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘सकाळ’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांना भविष्यातही पाठबळ देण्याचे आश्‍वासन अनिल आसलकर यांनी या वेळी दिले. त्याचबरोबर उपाय संस्थेच्या माध्यमातून अमरावती शहरातील फुटपाथवरील मुलांना साक्षर करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. 

या प्रसंगी गरजवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. संचालन दीपाली बाभूळकर यांनी केले. प्रास्ताविकातून हर्षल श्रीखंडे यांनी डोनेट युवर बुक उपक्रमाची माहिती दिली.  

Web Title: amravati news vidarbha news smita kolhe