बेलकुंडच्या डोहात तीन युवकांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

चांदूरबाजार (जि. अमरावती) - वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशच्या बेलकुंड येथे सोमवारी (ता. २५) दुपारी घडली. तीनही युवक येथील गो. सी. टोम्पे महाविद्यालयाचे बीएससी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी होते.  

तालुक्‍यालगत मध्य प्रदेश सीमेत बेलकुंड हे निसर्गरम्य ठिकाण आहे. मध्य प्रदेशातील पूर्णा नदीकाठी असणाऱ्या बाबाजी धुनीवाले यांच्या धुनीजवळ बेलकुंड येथे चांदूरबाजार तालुक्‍यातील शिरजगाव अर्डक येथील हर्षल अर्डक हा आपल्या वाढदिवसाची पार्टी करण्याकरिता  सहा मित्रांना घेऊन सोमवारी सकाळी गेला होता. या निसर्गरम्य ठिकाणी त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. मंदिराजवळ असणाऱ्या धबधब्याखाली सर्व मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पूर्णा प्रकल्प पूर्ण भरल्याने त्याच्या लाटा मंदिरापर्यंत उसळत राहतात. या ठिकाणी पूर्णा नदीत भरपूर पाणी असते. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी आरडाओरड केल्यावर गावकरी गोळा झाले. त्यांनी घटनेची माहिती महाराष्ट्रातील ब्राह्मणवाडा थडी पोलिसांना दिली. सोबतच आठणेर पोलिसांनासुद्धा माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत तिघांचाही थांगपत्ता लागलेला नव्हता.

सकाळी आमला गावच्या पाणबुड्यांनी तिघांचेही मृतदेह पाण्यातून काढून 
शवविच्छेदनाकरिता आठणेर येथे नेण्यात आले. उर्वरित चार विद्यार्थ्यांना या घटनेमुळे मोठा हादरा बसला आहे. पैकी एकाला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: amravati news youth