esakal | अमरावती : लसीकरण वाहनांना प्रतीक्षा सारथींची
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine van

अमरावती : लसीकरण वाहनांना प्रतीक्षा सारथींची

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : तालुकास्तरावर लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने जिल्ह्यातील १४ तालुक्यांना १४ वाहने उपलब्ध करून देण्यात आली, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे अद्यापही या वाहनांना सारथी मिळालेले नाही. वाहन चालकांच्या नियुक्त्या रखडल्याने लसीकरणालासुद्धा फटका बसत आहे.

कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. तत्पूर्वी मोठ्या लोकसंख्येत लसीकरण वेगाने होणे गरजेचे आहे. शहरी भागात लसीकरण केंद्रांची उपलब्धता सहजतेने होत आहे. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी आहे. केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने साहजिकच मोबाईल लसीकरणाचा पर्याय समोर आला. त्यासाठी राज्य शासनाकडून सीएसआर फंडातून अमरावती जिल्ह्यासाठी १४ तालुक्यांना प्रत्येकी एक याप्रमाणे लसीकरण वाहने पुरविण्यात आली आहेत.

हेही वाचा: औरंगाबादेत आजही लसीकरण बंदच, ४० हजार लोकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

ही वाहने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यात आली. मात्र अद्यापही वाहन चालकांच्या नियुक्त्या रखडल्याने लसीकरणाची मोहीमसुद्धा रखडली आहे. त्यामुळे सारथीविना ही वाहने सध्या यार्डातच उभी आहेत.

जिल्हास्तरावरून हालचाली?

आरोग्य अधिकाऱ्यांनी या वाहनांवरील चालकांच्या नियुक्तीचे तसेच अन्य नियोजनाचे अधिकार तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे, असे असतानाही काही पदाधिकाऱ्यांच्या जिद्दीमुळे जिल्हास्तरावरून वाहन चालकांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळेच या प्रक्रियेला विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.

वाहन चालकांची यादी तयार करण्यात आली असून लवकरच ती यादी अध्यक्षांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. वाहन चालक नियुक्तीबाबत कुठलेही मतभेद नाहीत.

- बाळासाहेब हिंगणीकर, आरोग्य सभापती, जि. प. अमरावती.

loading image
go to top