आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या दौऱ्यात 'राडा'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

आम आदमी पार्टी व शिवसैनिकांत "तू-तू, मै-मै'

आम आदमी पार्टी व शिवसैनिकांत "तू-तू, मै-मै'
अमरावती - आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या दौऱ्याच्या वेळी डफरीन हॉस्पिटलसमोर आम आदमी पार्टी व शिवसैनिकांत राडा झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट दिली.

रुग्णालयाची पाहणी करून त्यांनी पत्रकारांना मेळघाट दौऱ्यासंदर्भात माहिती दिली. याचवेळी आपच्या दोन-चार कार्यकर्त्यांनी डॉ. सावंत यांना निवेदन दिले. तेव्हा सावंत यांनी मेळघाटमधील समस्यांवर चर्चा केली.

दरम्यान, आपच्या कार्यकर्त्यांनी या विभागातील दोन डॉक्‍टर हे लोकप्रतिनिधी असल्याचा उल्लेख केला, यावर आमदार डॉ. सुनील देशमुख व आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी आपच्या सदस्यांना समजावून सांगितले; परंतु आपच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातच जोरजोरात घोषणा देण्यास सुरवात केली. या वेळी त्यांनी मंत्री अकार्यक्षम असल्याचा उल्लेख करत त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. याच कारणावरून शिवसैनिक संतापले व त्यांची आपच्या कार्यकर्त्यांशी झटापट झाली. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करून आपच्या कार्यकर्ते व शिवसैनिकांमधील वाद सोडविला.

शिवसेना पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे
जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या झटापटप्रकरणी "आप'चे पदाधिकारी डॉ. रोशन प्रभाकर अर्डक यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुनील खराटे, माजी जिल्हाप्रमुख सुधीर सूर्यवंशी आणि खासदार अडसूळ यांचे स्वीय सहायक सुनील भालेराव या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

Web Title: amravati vidarbha news confussion in dr. deepak sawant tour