

Amravati Water Crisis
esakal
अमरावती : पावसाने मारलेली दीर्घ दडी व आटत चाललेल्या जलस्रोतांमुळे यंदा अमरावती शहर, बडनेरा उपनगरासह मेळघाटातील धारणी व चिखलदरा, या तालुक्यांना आगामी काळात भीषण पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे. शासनाने आताच संभाव्य स्थिती बघता टंचाई कृती आराखडा व उपाययोजना आखण्याच्या सूचना दिल्या आहेत. यंदाचा उन्हाळा अमरावती शहर, मेळघाटसह सर्वच तालुक्यांना टंचाईच्या खाईत लोटणारा राहणार असल्याचे संकेत आहेत.
अमरावती शहर भूजलाच्या बाबतीत सुरक्षित श्रेणीत येत असले तरी शहरात घरोघरी खोदण्यात आलेल्या कूपनलिकांतून वारेमाप उपसा व सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांसह ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची कमतरता, यामुळे पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण झालेले नाही. याचा एकूणच परिणाम जलपातळी घटण्यात झाला आहे. अशातच पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात जलसाठा पर्याप्त झालेला नाही. मेळघाटातील धारणी व चिखलदरा, या दोन्ही तालुक्यांत टंचाईची स्थिती आतापासूनच निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची नेहमीच टंचाई असणाऱ्या गावांसह टंचाईग्रस्त गावांमध्ये दोन्ही तालुक्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
जलस्रोत आटू लागल्याने पाणीटंचाईचे ढग अमरावती शहरासह मेळघाटातील स्थिती भीषण वळणावर शहरातील विहिरी आणि भूजल पातळी उन्हाळ्याच्या सुरवातीला शहराच्या काही भागांत पाण्याचा उपसा वाढल्यामुळे वैयक्तिक कूपनलिका (बोअरवेल) आणि सार्वजनिक विहिरींच्या पातळीत १.५ ते २.५ मीटरपर्यंत तात्पुरती घट झाली होती. जून-जुलै महिन्यातील पावसाने भूजल पातळी काहीशी सुधारली असली, तरी ऑगस्ट-सप्टेंबरमधील कोरड्या हवामानामुळे भूजल पुनर्भरण अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे. महापालिका ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीसाठी शहराचा विशेष ‘टंचाई कृती आराखडा’ तयार करीत आहे.
अमरावती शहर शहराचा मुख्य पाणीपुरवठा अप्पर वर्धा धरणावर अवलंबून आहे. अमरावती आणि बडनेरा शहराला मुख्य पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणातून केला जातो. अमरावती जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या सरासरी ६१ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरदरम्यान विदर्भात पडलेल्या मोठ्या पावसाच्या खंडामुळे धरणातील साठा मागील वर्षाच्या तुलनेत मर्यादित आहे.
यामुळे जलसंपदा विभाग व अमरावती महापालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मेळघाट, धारणी मेळघाटातील धारणी तालुका भूजल पुनर्भरण आणि पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. तालुक्याचा भूभाग बेसॉल्ट खडकांचा व तीव्र उताराचा आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरण्याऐवजी वेगाने वाहून जाते. परिणामी, दरवर्षी उन्हाळ्यात (मार्च ते मे २०२६) येथील भूजल पातळी वेगाने खालावते.
मे २०२६ च्या तीव्र उन्हाळ्यात धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील २५० हून अधिक गावांना पाणीटंचाईची झळ बसली होती, तर ९ पेक्षा जास्त गावांना २१ हून अधिक टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. मॉन्सूनच्या सुरवातीला जुलै २०२६ मध्ये धारणी व मेळघाट भागात अतिवृष्टी झाली होती. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन भूजल पातळी तात्पुरती सुधारली होती.
जुलैच्या अतिवृष्टीनंतर मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरदरम्यान धारणी तालुक्यात सलग ३० दिवसांपेक्षा जास्त काळ (चार आठवडे) पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. पावसाच्या या मोठ्या खंडामुळे विहिरींचे नैसर्गिक भूजल पुनर्भरणदेखील ठप्प झाले आहे. चिखलदरा चिखलदरा तालुका हा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण डोंगराळ भूगोलामुळे भूजल साठवणुकीच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. डोंगराळ आणि बेसॉल्ट खडकांचा (पठारी) भाग असल्याने पावसाचे पाणी वेगाने वाहून जाते.
गतवर्षी उन्हाळ्यात चिखलदरा शहरासह ग्रामीण भागात भीषण टंचाई निर्माण झाली होती. ‘सक्कर तलाव’ पूर्णपणे कोरडा पडल्याने शहरात जलसंकट निर्माण झाले होते. जून आणि जुलै २०२६ च्या सुरवातीला ऐन पावसाळ्यातही पाणी नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्हीव्हीआयपी विश्रामगृह कुलूपबंद करावे लागले होते. हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटकांना पाण्यासाठी पूर्णपणे खासगी टँकर्सवर अवलंबून राहावे लागले.
शहराशेजारील आमझरी येथून पाणी आणून चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२६ दरम्यान संपूर्ण तालुक्यात सलग ३० ते ३५ दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाने दडी मारली. सक्कर तलाव व इतर स्थानिक जलस्रोत अपेक्षेप्रमाणे न भरल्यामुळे भूजल पुनर्भरण ठप्प झाले आहे. तालुक्याला लागून असलेल्या शहापूर आणि दुर्गम गावांमधील विहिरी व कूपनलिका तळाला गेल्यामुळे पाच किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे.
"धरणांतील सद्यस्थितीतील जलसाठा बघता शहराला पाणीपुरवठा करताना काही काटकसरीच्या उपाययोजना आखाव्या लागणार आहेत. दिवाळीनंतर शहराला तीन दिवसांआड पुरवठा करण्याचे नियोजन करावे लागेल, असे विचाराधीन आहे. त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही."
-संजय लेवरकर, कार्यकारी अभियंता, मजीप्रा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.