भाजप, काँग्रेसमध्ये होणार ‘धुमश्‍चक्री’

सुधीर भारती - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

पक्षीय बलाबल
एकूण जागा -    ५९
काँग्रेस -     २५ 
भाजप -        ९ 
शिवसेना -    ७ 
राष्ट्रवादी काँग्रेस -     ७
विदर्भ जनसंग्राम -     २ आरपीआय -     १ 
अपक्ष -         १

अमरावती - जिल्हा परिषदेत सत्ताधारी काँग्रेसच्या कार्यकाळात अखर्चित राहिलेला कोट्यवधींचा निधी, मेळघाटातील आरोग्य केंद्रांच्या दुरुस्त्यांमध्ये झालेला घोळ हेच प्रमुख मुद्दे जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारात गाजणार आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेसनेसुद्धा भाजपच्या नोटाबंदीवरून दोन हात करण्यास सुरुवात केल्याने भाजप व काँग्रेसमध्येच खऱ्या अर्थाने निवडणुकीत धुमश्‍चक्री उडणार आहे. 

दुसरीकडे निवडणुका तोंडावर आल्या तरी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंबूत शांतता पसरली आहे. या दोन्ही पक्षांची ताकद निवडक तालुक्‍यांमध्ये असल्याने त्याच ठिकाणी उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. 

भाजपकडून काँग्रेसच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात येत असले तरी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपचे ९ सदस्य कधीच सभागृहात  आक्रमक झाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. निवडणुकीत युती करायचीच नाही, असा पवित्रा भाजप व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वबळावर उमेदवार लढविण्याची तयारीदेखील सुरू केली; मात्र प्रदेशस्तरावरून ऐनवेळी काय आदेश सुटतात? त्याकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र काही ठिकाणी आघाडीचा निर्णय घेतला आहे. नोटाबंदीवरून ग्रामीण भागात सरकारबद्दल चीड असल्याचा दावा काँग्रेस करीत आहे तर भाजपने नोटाबंदीचे फायदे जनतेला सांगण्यास सुरुवात केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह सर्वच पदाधिकाऱ्यांचे विद्यमान सर्कल राखीव  झाल्याने अनेकांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, बांधकाम सभापती गिरीश कराळे, महिला व बालकल्याण सभापती वृषाली विघे, माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत.  

Web Title: amravati zp election