'आमटे आठवडा' म्हणजे काय माहिती आहे का? वाचा मग...

Amte week in Gadchiroli
Amte week in Gadchiroli

गडचिरोली : डिसेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा "आमटे आठवडा' म्हणून ओळखला जातो. तीन पिढ्यांपासून समाजकार्यात आयुष्य वेचणाऱ्या आमटे परिवाराशी संबंधित अनेक घटना या आठवड्यात घडल्या आहेत. त्यातील महत्त्वाची घटना लोकबिरादरी प्रकल्पाची आहे. अतिशय घनदाट रानात प्रारंभ झालेल्या या प्रकल्पाचा वर्धापनदिन सोमवारी (ता. 23) पार पडला. 

कर्मयोगी बाबा आमटे यांच्या मार्गदर्शनात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी धडाडीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने 23 डिसेंबर 1973 रोजी भामरागड तालुक्‍यातील दुर्गम अशा हेमलकसा या गावात लोकबिरादरी प्रकल्पाची सुरुवात केली. या प्रकल्पात गोंड, माडिया आदिवासी बांधवांसाठी मोफत रुग्णालय आहेत. तसेच सहाशे विद्यार्थ्यांसाठी पहिली ते बारावीपर्यंतची आश्रमशाळा आहे. कुठलाही आसरा नसलेल्या वन्यजीवांना मायेची ऊब देणारे वन्यप्राणी अनाथालय आहे. 

आठवड्यात 23 डिसेंबरला लोकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापनदिन पार पडला. 24 डिसेंबर रोजी डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा होणार आहे. 25 डिसेंबरला डॉ. मंदाकिनी आमटे यांचा वाढदिवस तर 26 डिसेंबर डॉ. प्रकाश आमटे यांचा वाढदिवस आणि स्व. बाबा आमटे यांची जयंती असते. असे सगळे योग 23 ते 26 डिसेंबर रोजी जुळून येत असल्याने आमटे परिवारासाठी व त्यांच्या सर्व स्नेही, चाहत्यांसाठीही हा आठवडा खास असतो. 

तिसऱ्या पिढीतूनही महत्त्वाची कामे

विशेष म्हणजे आमटे परिवाराच्या तिसऱ्या पिढीतील अनिकेत आमटे यांच्या संकल्पनेतून या परिसरात जलसंधारणाची आगळी व प्रभावी मोहीम सुरू झाली आहे. याअंतर्गत पाणीसाठा करण्यासाठी तब्बल वीस गावांत लोकसहभागातून तलावनिर्मिती करण्यात आली आहे. तसेच शिक्षणाची गंगा या दुर्गम भागात प्रवाहित करण्यासाठी नेलगुंडा आणि जिंजगाव या गावांत नवीन इंग्रजी माध्यमाची शाळा निर्माण करण्यात आली. याशिवाय अनेक महत्त्वाची कामे सुरू आहेत. महिलांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी दोन गावांत बचतगट बळकटीकरण करणे सुरू आहे. 

असे असतील कार्यक्रम

लोकबिरादरी प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (ता. 23) सकाळी सव्वाअकराला वर्धापनदिन साजरा करण्यात आला. 12 ते 5 वाजेपर्यंत नवनवीन खेळ, सायंकाळी साडेसातला सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. मंगळवारी (ता. 24) मास्टर ऍण्ड मिस स्पर्धा, खेळ व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होतील. बुधवारी (ता. 25) शैक्षणिक गंमत जत्रा व प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, गुरुवारी (ता. 26) सकाळी साडेअकराला कर्मयोगी बाबा आमटे यांची 105 वी जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com