आस्था साऱ्यांच्या आस्थेचा विषय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

जन्माने अंध तसेच वैद्यकीय भाषेत सॅवन्त सिंड्रोम हा आजार असूनही पुढील वर्षी येणाऱ्या एक तारखेचा वार ती सांगते. चार वर्षांपूर्वी कॅलेंडरमध्ये मंगळवारी दिवाळी आली होती, ती तारीख सांगते. तिच्या मेंदूमध्ये विशेष गुण असल्यामुळेच आस्था साऱ्यांच्या आस्थेचा विषय बनली आहे. 

नागपूर : आईच्या वाट्याला जेव्हा एखादे मूल अंध, दिव्यांग तसेच मुदतपूर्वी जन्माला येते, तेव्हा त्या मातेच्या स्वप्नांना तिथेच पूर्णविराम मिळतो. त्या चिमुकल्यांच्या आई-वडिलांचे आयुष्य पणाला लागते. कारण, अशा मुलांना घडविणे आणि संस्कारित करणे तपस्याच असते. मात्र, आठ वर्षांच्या आस्थाच्या आईची धडपड नजरेत भरणारी. आस्थाला जगणं शिकवण्यासाठी त्या मातेने आपल्या दुसऱ्या मुलाला कुटुंबाच्या स्वाधीन केले आणि दिव्यांग आस्थाकडे तिने पूर्ण लक्ष केंद्रीत केले. 

आस्था डहरवाल मध्य प्रदेशातील बालाघाटजवळील जराह मोहगाव येथील रहिवासी आहे. आता ती आठ वर्षांची झाली आहे. पाचव्या महिन्यातच अर्थात नजर येण्यापूर्वीच तिचा जन्म झाला. यामुळे ती अंध आहे. शाळेपासून दूर... अंध असल्याने दिनदर्शिका कशी असते हे तिला ठाऊक नाही.

ब्रेकिंग - पत्नीने केला दुसरा घरोबा.... रागाच्या भरात पतीने उचलले हे पाऊल

परंतु, आगामी वर्षातील तारखेचा वार विचारताच ती तत्काळ उत्तर देते. जन्माने अंध तसेच वैद्यकीय भाषेत सॅवन्त सिंड्रोम हा आजार असूनही चार वर्षांपूर्वी कॅलेंडरमध्ये मंगळवारी दिवाळी आली होती, ती तारीख सांगते. तिच्या मेंदूमध्ये विशेष गुण असल्यामुळेच आस्था साऱ्यांच्या आस्थेचा विषय बनली आहे. कोणताही गृहपाठ किंवा शाळेत जाऊन अभ्यास न करता जगातील शेकडो देशांच्या राजधानीचे नाव ती सांगते. 

जगातील मानसशास्त्राच्या दृष्टीने दुर्मीळ अशा "सॅवन्त सिंड्रोम'ची रुग्ण असलेल्या आस्थाला "स्मरणशक्ती'चे वरदान लाभले असल्यानेच आस्थाची आई ज्योती आणि वडील नरेंद्र डहरवाल आस्थाकडे विशेष लक्ष देत आहेत. प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्याकडे गतवर्षी कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला तपासणीसाठी आली होती, हे ती तत्काळ सांगते. 

सविस्तर वाचा - किती ही मस्ती? गंमत म्हणून केले असे अन्‌...

तीन सेकंदात देते उत्तर

मुदतीपूर्वी जन्माला आलेल्या आस्थाचे जन्माच्या वेळचं वजनही अवघे 605 ग्रॅम होते. ती ऑटिस्टीक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. शारीरिक वाढ संथगतीने होत असली तरी याच आस्थाला बुद्धिमत्ता मात्र अधिक असल्याचे जाणवू लागल्याने आईवडिलांनी तिला जपले. अंकलिपी कधीही बघितली नाही, मात्र पाढे पाठ न करता तीन सेकंदाच्या आत ती उत्तर देते. एखाद्या गायकाचा आवाज तिला ऐकविला तर तो आवाज ती कधीही विसरत नाही. 

जगभरात 350 रुग्ण 
जगभरात सॅवन्त सिंड्रोमग्रस्तांची संख्या अवघी 350 आहे. यात किम पीक, टॉम विगीन, इलेन, फ्लो ऍण्ड के असे काही व्यक्ती असून, हा आजार जन्माला घेऊन येणाऱ्या व्यक्ती गणित, स्मरणशक्ती, कला, संगीत क्षेत्रात उत्तुंग यश मिळवतात. 
- डॉ. चंद्रशेखर मेश्राम, 
प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur : aastha Syavant Syndrome patients