आनंदवनचे स्मार्ट व्हिलेज मॉडेल दुर्लक्षित : डॉ. आमटे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नागपूर - शेती, वीज, पाण्यासह रोजगाराच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणारे आनंदवन स्मार्ट व्हिलेजचे रोल मॉडेल आहे. जगात कौतुक होत असताना महाराष्ट्रात आनंदवनला स्वीकारले जात नसल्याची खंत वरोरा येथील महारोगी सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे यांनी येथे व्यक्त केली.

नागपूर - शेती, वीज, पाण्यासह रोजगाराच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणारे आनंदवन स्मार्ट व्हिलेजचे रोल मॉडेल आहे. जगात कौतुक होत असताना महाराष्ट्रात आनंदवनला स्वीकारले जात नसल्याची खंत वरोरा येथील महारोगी सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे यांनी येथे व्यक्त केली.

जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडियाच्या नागपूर विभागाच्या कार्यकारिणाचा पदग्रहण सोहळा हॉटेल सेंटर पॉइंट येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. मंचावर डी. वाय. पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. डब्ल्यू. कुळकर्णी, बजाज ग्रुप ऑफ
इंडस्ट्रिजचे अध्यक्ष हरगोविंद बजाज, दै. "सकाळ'चे कार्यकारी संपादक शैलेश पांडे उपस्थित होते. वृद्ध नागरिकांना आरोग्यदायी आधार देण्यासोबतच त्यांची सेवा करणाऱ्या सेवावृत्तींना जेरियाट्रिक सोसायटीतर्फे दरवर्षी श्रावणबाळ पुरस्काराचे वितरण करण्यात येतो. यंदा पहिल्या श्रावणबाळ पुरस्काराने रोहिणी चितळे, डॉ. रमाकांत पवार यांना गौरविण्यात आले. वयाच्या 93 व्या वर्षीही वैद्यकीय सेवा देणारे शल्यचिकित्सक डॉ. फजल यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यासोबत डॉ. संजय बजाज यांच्या "डॉक्‍टर मला वाचवा... पडण्यापासून' या नव्या पुस्तकासोबतच त्यांच्या "उत्तरायण' या आणखी एका पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही झाले. डॉ. राजेश सोनी यांनी वृद्ध महिलांच्या मूत्रमार्गात संयम न राहण्याच्या समस्या, डॉ. दीपक तलवार यांनी श्वासनलिका अवरुद्धतेचे व्यवस्थापन तर डॉ. रवी वानखेडे यांनी वार्धक्‍यात योग्य वैज्ञानिक औषधींची निवड या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. रवी वानखेडे आणि डॉ. गौरव जयस्वाल यांनी केले. यावेळी विजया शेवाळकर, हडस विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण उपगडे आणि जीएसआयच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिता बानोराज उपस्थित होत्या.

Web Title: Anandwan Smart Village Model ignored: Dr. Amte