आणि घात झाला... मुलाला वाचविताना वडिलाचा बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

पवनी (भंडारा) : शांतिपूजा करण्यासाठी पवनी येथे आलेल्या लाखनीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पाटेघाटावर शांतिपूजा करताना मुलगा बुडू लागला. पोटच्या गोळ्याचा डोळ्यांदेखत जीव जाताना पाहून जिवाची पर्वा न करता वडिलाने नदीत उडी घेतली. मुलाला वाचविले. त्याला काठावर आणले. मात्र, घात झाला. पायऱ्यांवरून पाय घसरला आणि वडील बुडाले ते कायमचेच. आज, दुपारी 12च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. 

लीलाधर भीमराव हारोडे (वय 60, रा. समर्थनगर, लाखनी) हे भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील प्रसिद्ध डॉक्‍टर. अनेकांचे आजार दूर करून रुग्णांना आपलेसे करणारे लीलाधर धार्मिक वृत्तीचे. म्हणून त्यांनी आज, शुक्रवारी पवनी येथील पाटेघाटावर पूजा ठेवली. याकरिता येथील पाटेघाटावर डॉ. लीलाधर, पत्नी साधना व मुलगा परेश हे तिघेही भूमेश्‍वर नामक महाराज यांच्यासह शांती व पूजा करण्यासाठी कारने येथे आले होते. पूजाविधी सुरू असताना त्यांचा मुलगा अंघोळ करू लागला. मात्र, दुर्दैव आड आले. त्याचा पाय पायऱ्यांवरून घसरला. पाहता पाहता तो नदीत बडू लागला. "मला वाचवा, मला वाचला' ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याने सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले. लीलाधरही त्या वेळी तिथेच होते. पोटचा गोळा पाण्यात बुडताना पाहून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता ते पायऱ्यांवर आले. काठीच्या आधाराने त्यांनी बुडणाऱ्या मुलाला बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. मुलाला नदीतून बाहेर काढले. मुलगा वाचल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते. मात्र, नियतीने घात केला. पायऱ्यांवरून त्यांचा पाय अचानक घसरला. लीलाधर नदीत बुडू लागले. पाहता पाहता ते खोल डोहात बुडाले. मुलाला वाचविण्याचा आनंद ते क्षणभरही बघू शकले नाही. काही कळायच्या आत होत्याचे नव्हते झाले. पाटेघाटावर आक्रोश सुरू झाला. परिसरात भोई किंवा मासेमार नसल्याने त्यांना मदत करता आली नाही. लीलाधर हारोडे यांच्या अशा जाण्याने अनेकांचे डोळे पाणावले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And killed ... father drowns while saving child