अंगणवाडी सेविकांच्या हातात अँड्रॉइड फोन

राघवेंद्र टोकेकर 
बुधवार, 22 मे 2019

अंगणवाडी बालवाड्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयातर्फे अंगणवाडी सेविकांना अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले असून, येत्या शैक्षणिक वर्षातील वहिवाट ऑनलाइन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नागपूर - अंगणवाडी बालवाड्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयातर्फे अंगणवाडी सेविकांना अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले असून, येत्या शैक्षणिक वर्षातील वहिवाट ऑनलाइन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोबाईल सॉफ्टवेअरच्या शिकवणी वर्गाचा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे.  

राज्यातील अंगणवाडी बालवाड्यांना अद्ययावत रूप मिळावे व कमी वेळात अंगणवाडी सेविकांचे अहवाल शासनापर्यंत पोहचावे या उद्देशाने एका मोबाईल सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. कॅस अर्थात ‘कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर’ असे त्याचे नाव आहे. सध्या शहरात पाच ठिकाणी व कामठीत ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण वर्गाची आखणी करण्यात आली असून, सेविकांना ‘पॅरासोनिक इलुगा आय सेवन’ हा सुसज्ज मोबाईल देण्यात आला आहे. 

हे प्रशिक्षण पाच विधानसभा मतदारसंघांप्रमाणे विभागण्यात आले असून, सुमारे ९८१ सेविकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यांना चार टप्प्यांत डेमो मोडद्वारे तर दुसऱ्या दिवशी प्रॅक्‍टिकल मोडद्वारे हे ॲप कसे उपयोगात आणावे याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे. या सॉफ्टवेअरमध्ये १० मॉड्यूल असून, अंगणवाडी सेविका सांभाळत असलेला हिशेब, विद्यार्थ्यांची पटयादी, गृहसंपर्काचे टप्पे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, आधारकार्ड यासारखी सर्वच माहिती ऑनलाइन व्हावी या उद्देशाने हे ॲप तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अंगणवाडी सेविकेला यासाठी विशेष मोबाईल देण्यात आला आहे. त्या मोबाईलमध्ये कॅस सॉफ्टवेअर, बारकोडसह आवश्‍यक त्या सर्व बाबी इन्स्टॉल करून देण्यात आल्या आहेत. शिवाय राज्यातील प्रत्येक अंगणवाडी सेविकेला अकरा अंकी बारकोड देण्यात आला असून, लॉग इन केल्याशिवाय सेविकेला त्यात माहिती भरता येणार नाही.   

अँड्रॉइड हॅण्डलिंग न जमल्यास गल्लत 
प्रशिक्षण वर्गातील अनेक अंगणवाडी सेविकांना कागदी अहवाल मोबाईलच्या मदतीने भरावे लागणार असल्याने आपल्याला ते जमेल का? याबाबत शंका आहे. शिवाय हा मोबाईल गहाळ झाल्यास, ओला झाल्यास अथवा बंद पडल्यास अहवालाचे काय, असाही प्रश्‍न या महिलांशी संवाद साधताना जाणवला आहे. त्यामुळे अँड्रॉइड मोबाईलचे हॅंडलिंग न जमल्यास अंगणवाडी सेविकेची गल्लत होणार हे निश्‍चित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Android phone in the hands of Anganwadi worker