अंगणवाडी सेविकांना दिवाळी-भाऊबीजेची भेट; प्रत्येकी २ हजार रुपये देण्याचा शासनाचा निर्णय 

 सुधीर भारती 
Friday, 13 November 2020

कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहोचवणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

अमरावती ः एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहोचवणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे; त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येत असल्याचे महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण; थंडी पळविली आणि पावसाची शक्यता

राज्यात 93 हजार 348 अंगणवाडी सेविका, 88 हजार 353 अंगणवाडी मदतनीस व 11 हजार 341 मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 2 हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी 38 कोटी 61 लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे.

ऍड. ठाकूर म्हणाल्या, की कोरोनाच्या लॉकडाउन काळात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असताना बालकांच्या, मातांच्या पोषण आहाराचा, कुपोषणाचा प्रश्‍न गंभीर होता. या वेळी दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करीत अशा विविध अडचणींवर मात करत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचवला. स्थलांतरित मजुरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. यामुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्रने देशात अव्वल क्रमांक पटकावला.

अधिक वाचा - शेतकऱ्यांना दिवाळी भेट; पीक नुकसानीचे २७ कोटी मिळाले

कोविडमुक्त महाराष्ट्रासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी, या अभियानातही घरोघरी जात महत्त्वाची जबाबदारी महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा अभिमान शासनाला आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्यात येत आहे, असेही ऍड. ठाकूर म्हणाल्या. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anganwadi workers will get two thousand each as diwali gift