esakal | शिवसैनिक उतरले रस्त्यावर अन् कंगना राणावतला चपलेने बदडले!
sakal

बोलून बातमी शोधा

Anger against actress Kangana Ranaut in Yavatmal

शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी कंगना रानावतचे पोस्टर पायदळी तुडवत तसेच चपलेने बदडत तिचा निषेध केला. कंगनाला मुंबईत असुरक्षित वाटत असेल तर तिने पाकिस्तानात जाण्याचा सल्ला सुद्ध त्यांनी दिला.

शिवसैनिक उतरले रस्त्यावर अन् कंगना राणावतला चपलेने बदडले!

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी यवतमाळात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून कंगना राणावतच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. मुंबई पोलिस तसेच महाराष्ट्राला बदनाम करण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप सुद्धा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणी सिबीआयचा तपास सुरू आहे. दुसरीकडे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता. सदर प्रकरणात योग्य तपास न केल्याचा ठपका ठेवत कंगना राणावत ही सातत्याने उद्धव ठाकरे सरकार विरोधात बेताल वक्तव्य करीत आहे. आता तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात सुद्धा कंगनाने चुकीचे वक्तव्य करणे सुरू केले आहे.

वाचा - नागरिकांनो सावधान! हा जीव तुमच्या घरी तर नाही ना? असेल तर आताच काढा बाहेर.. अन्यथा..

दरम्यान, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाल्याने यवतमाळच्या दत्त चौकात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून प्रचंड नारेबाजी केली. शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी कंगना रानावतचे पोस्टर पायदळी तुडवत तसेच चपलेने बदडत तिचा निषेध केला. कंगनाला मुंबईत असुरक्षित वाटत असेल तर तिने पाकिस्तानात जाण्याचा सल्ला सुद्ध त्यांनी दिला.

याप्रसंगी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, यवतमाळ विधानसभेचे सह संपर्क प्रमुख संतोष ढवळे, प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, संजय रंगे, प्रवीण निमोदिया, पिंटू बांगर, अशोक पुरी, संजय उपगलवार, सुधीर मुनगीनवार, शिवसेना महिला आघाडीच्या निर्मला विनकरे, कल्पना दरवई, ज्योती चिखलकर, संगीता पुरी, गार्गी गिरटकर, रश्मी तोंदवाल, विद्या सोमदे, संगिता बागडे, अर्चना बागडे, अर्चना भगत, अश्विनी बागडेश्वर उपस्थित होत्या.

अवश्य वाचा - हे तर जणू तुकाराम मुंढेच! नागपूरच्या नव्या आयुक्तांचा तब्बल ६६ अधिकाऱ्यांना दणका..

भाजप राजकारण करीत आहे
राज्यात तसेच देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येचे भाजप राजकारण करीत आहे.
- राजेंद्र गायकवाड
जिल्हाप्रमुख, शिवसेना

भाजपने वकिली बंद करावी
कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली आहे. दुसरीकडे भाजपचे नेते मात्र तिची वकिली करीत आहे. यावरून कंगना ही भाजपची प्रवक्ता असल्याचे दिसून येते. कंगना राणावतने आपले बेताल वक्तव्य बंद करावे. महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. वादग्रस्त विधान केल्याने कंगनाने माफी मागावी. अन्यथा तिचा एकही चित्रपट आम्ही महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही.
- पराग पिंगळे,
शिवसेना जिल्हाप्रमुख, यवतमाळ

 संपादन - नीलेश डाखोरे