‘जलक्रांतीचे जनक' कोण?; सुधाकरराव नाईक की शंकरराव चव्हाण?, यामुळे चाहत्यांमध्ये संताप

Anger among vasantrao naik fans over government circular
Anger among vasantrao naik fans over government circular

पुसद (जि. यवतमाळ) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारने १२ जून २०२० रोजी परिपत्रक जाहीर करून महाराष्ट्रातील 'जलक्रांतीचे जनक' शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १४ जुलै रोजी 'जलभूषण पुरस्कार' प्रदान करण्याचे ठरवले आहे. मात्र, जलसंधारणाचे खरे कार्य माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी केले आहे. महाराष्ट्र सरकारने १० मे हा त्यांचा स्मृतिदिन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 'जलसंधारण दिन' म्हणून घोषित केलेला आहे. त्यांना 'जलक्रांतीचे प्रणेते' घोषित केल्यानंतर आता राज्य सरकारने 'जलक्रांतीचे जनक' म्हणून शंकरराव चव्हाण यांना घोषित करून त्यांच्या जन्मतिथीला जलभूषण पुरस्कार देण्याची रितसर कारवाई केल्याने सुधाकरराव नाईक यांच्या कार्यावर कुरघोडी केल्याची संतप्त भावना चाहत्यांनी 'सोशल मीडिया'तून व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र सरकारने हे परिपत्रक काढताना महाआघाडी सरकारमधील काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुधाकरराव नाईक यांचे जलक्रांतीचे अविस्मरणीय कार्याला डावलून माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना 'जलक्रांतीचे जनक' हा सन्मान देण्यात आलेला आहे. सुधाकररावांनी जलसंधारणाच्या खात्याची महाराष्ट्रात पहिली सुरुवात केली. जलसंधारणाला राज्यात मोठी चालना दिली. राज्य जलसंधारण सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्रात झंझावती दौरे करून भूजलपातळी वाढविण्यासाठी कार्यक्रम आखले.

'जलसंधारणाचे कार्य झाले नाही तर भविष्यात महाराष्ट्राचे वाळवंट होईल', असा इशारा त्यांनी दिला. जलचळवळ जनचळवळ करण्यासाठी त्यांनी शेवटच्या काळात क्षणाचीही उसंत घेतली नाही. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी 'जलक्रांतीचे जनक' या नात्याने त्यांचा स्मृतिदिन 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. आज मात्र, 'जलक्रांतीचे जनक' हे बिरुद शंकरराव चव्हाण यांच्या नावापुढे लावण्यात आले आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दहा लाख रुपयांचे प्रथम, द्वितीय व तृतीय जलभूषण पुरस्कार जलसंपदा विभाग यशदा मार्फत देण्याचे ठरविण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात शंकरराव चव्हाण यांनी पाटबंधारे मंत्री असताना धरणांच्या कामांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, जलसंधारणाचे खरे काम सुधाकरराव नाईक यांनी पोटतिडिकीने केले. त्यामुळेच त्यांची ओळख 'जलक्रांतीचे प्रणेते' म्हणून महाराष्ट्राला झाली. परंतु, आज सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुधाकरराव नाईक यांच्या जलक्रांतीच्या कार्यावर कुरघोडी करून त्यांच्या कर्तृत्वावर अन्याय केला आहे, अशा तीव्र भावना बंजारा समाजातील लोक व त्यांच्या चाहत्यांमध्ये व्यक्त होत आहेत.

महानायकांना नेहमीच डावलण्याचे राजकारण

हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक व जलक्रांतीचे प्रणेते सुधाकरराव नाईक यांची मोलाची कामगिरी महाराष्ट्राला माहित आहे. परंतु, काँग्रेसने नेहमीच या दोन लोकनेत्यांच्या बाबतीत अन्याय केलेला आहे. त्यांच्या अद्वितीय कार्याला डावलून विशिष्ट लॉबीने त्यांना महत्त्व देण्याचे टाळले आहे. भटक्या व विमुक्त जातीतून आलेल्या महानायकांना नेहमीच डावलण्याचे राजकारण होत आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव म्हणाले.

महाराष्ट्र सरकारने यथोचित सन्मान राखावा

वास्तविक पाहता विदर्भाच्या पुसद तालुक्यातील इसापूर धरणाचे ८५ टक्के पाणी शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यात पळविण्याचा त्यांच्यावर मोठा ठपका आहे. या प्रवृत्तीचा मी निषेध करतो. सुधाकररावांच्या जलक्रांतीच्या कार्याचा महाराष्ट्र सरकारने यथोचित सन्मान राखावा, अन्यथा त्यांचे चाहते रस्त्यावर उतरतील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव म्हणाले.

कार्यावर पाणी फेरण्याचा प्रयत्न
जलसंधारणाचे खरे कार्य माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी केले आहे. म्हणूनच 'जलक्रांतीचे जनक' म्हणून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांचा गौरव केला. त्यांचा स्मृतिदिन 'जलसंधारण दिन' म्हणून घोषित केला. पुढे मात्र, यावर अंमलबजावणी न करता त्यांची कायम आठवण राहावी व त्यांच्या कार्यातून लोकांना प्रेरणा मिळावी, यासाठी कुठेही तरतूद करण्यात आलेली नाही. उलट तत्कालीन कृषिमंत्री रामकृष्ण विखे पाटलांनी आजोबा 'विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने 'कृषीदिन'चे परिपत्रक काढून वसंतराव नाईक यांच्या अतुलनीय कार्यावर कुरघोडी केली व आता शंकरराव चव्हाण यांचे पुत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्वतःच्या वडिलांचा 'जलक्रांतीचे प्रणेते' म्हणून सुधाकरराव यांच्या कार्यावर पाणी फेरण्याचा प्रयत्न केला आहे.
- मनीष जाधव
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

संपादन - नीलेश डाखोरे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com