दारुबंदीसाठी रोखला संतप्त महिलांनी महामार्ग 

Andolan
Andolan

सिरोंचा (जि. गडचिरोली) : गावातील दारूविक्री बंद करा, पोलिसांना नावे दिलेल्या दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करा, या मागण्यांसाठी सिरोंचा तालुक्‍यातील अंकिसा येथील महिलांनी महामार्गावर तीन तास चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात 12 गावांतील सुमारे 200 महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे सिरोंचा मार्गावरील वाहतूक तीन तास प्रभावीत झाली होती. 

अंकिसा गाव झाले दारूविक्रीचे केंद्र 
असरअल्ली पोलिस ठाण्याअंतर्गत येणारे अंकिसा हे गाव तालुक्‍यातील दारूविक्रीचे मोठे केंद्र बनले आहे. या गावामुळे आसपासच्या गावांनी केलेली दारूबंदी प्रभावित होत आहे. काही दिवसांपूर्वी मुक्तिपथ चमूने गाव संघटनेच्या महिलांसह येथील 26 विक्रेत्यांकडे धाड मारून कारवाई केली होती. तसेच या विक्रेत्यांची यादीही पोलिसांना दिली; पण अद्याप ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे गावात दारूविक्री सुरूच आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी अंकिसा ते सिरोंचा मार्गावर 3 तास चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनात बालमुत्तापल्ली, गेरापल्ली, जंगलपल्ली, लक्ष्मीदेवपेठा, लक्ष्मीदेव रै., अंकिसा माल, अंकिसा चक, केवलपेठा, रंगधामपेठा, जोडपल्ली, दुब्बापल्ली, वडधम येथील महिला सहभागी झाल्या होत्या. 

पोलिसांची कारवाई शून्य 
मुक्तिपथ संघटनेच्या महिलांनी अनेक गावांतील दारूविक्री बंद केली. त्यामुळे येथील लोक अंकिसा येथे दारू पिण्यासाठी येतात. तसेच अंकिसा येथे बारसदृश दहा दुकाने असून, विक्रेते हिंसक प्रवृत्तीचे आहेत. प्रत्येक विक्रेत्याची माहिती गाव संघटनेने पोलिसांना दिली आहे. पण, कठोर कारवाई होत नसल्याने विक्री सुरू आहे. 

अन्यथा पोलिस मुख्यालयात आंदोलन करू! 
येथील विक्रेत्यांमुळे आता इतरही गावांतील विक्रेते सक्रिय होत आहेत. परिणामी महिलांना मारझोड करण्याचे प्रकार वाढले आहे. या सर्वांवर आळा बसण्यासाठी आधी अंकिसा येथील विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून दारूविक्री पूर्णतः बंद करण्याची मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली. कारवाई न झाल्यास पुढचे आंदोलन थेट जिल्हा पोलिस मुख्यालयात करू, असा इशाराही महिलांनी दिला. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com