अनिल देशमुखांची "वेळ' चुकली!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मंत्री अनिल देशमुख यांची वेळ चुकल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. ते उद्या शुक्रवारी सकाळी दहा वाजता अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांच्या स्वीय सहायकांतर्फे सांगण्यात आले असले तरी यामुळे शंका-कुशंकांना पुन्हा उधाण आले आहे. 

अनिल देशमुख यांनी उमेदवारी दाखल करण्याची जंगी तयारी केली होती. सभा घेऊन शक्तिप्रदर्शनही केले. संपूर्ण मतदारसंघातून सुमारे पंचवीस ते तीस हजार नागरिक या बैठकीला होते. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, अभिनेत्री अलका कुबल, अलीकडेच करोडपती झालेल्या अंजनगाव सुर्जीच्या बबिता ताडे अशा सेलिब्रेटींनाही त्यांनी बोलावले होते. वाजत-जागत आणि ढोल-ताशांच्या पथकात उघड्या जीपमधून अनिल देशमुख अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल झाले. मात्र, त्यांना उशीर झाल्याचे बाहेरच सांगण्यात आले. यानंतरही देशमुख आपल्या कुटुंबीयांसह आत गेले. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. उद्या दहा वाजता अर्ज भरायला येत असल्याचे एक अर्ज देऊन सर्व निघून गेले. 
शंका-कुशंका 
निवडणूक अर्ज भरण्याची वेळही निश्‍चित करण्यात आली आहे. सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत अनेक वर्षांपासून एकदाही बदल झालेला नाही. मात्र, साडेतीन वाजेपर्यंत मुदत असल्याचे गृहीत धरून देशमुख अर्ज भरायला गेले. अनिल देशमुख आतापर्यंत पाच वेळा विधानसभेतील निवडणूक लढले आहेत. त्यापूर्वी जिल्हा परिषदेचीही निवडणूक त्यांनी लढविली होती. त्यामुळे देशमुख यांची "वेळ' चुकलीच कशी असा प्रश्‍न अनेकांना भेडसावत आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anil deshmukh