विधानपरिषद निवडणूक : काँग्रेसकडून अनिरुद्ध वनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

अतुल मेहेरे
Thursday, 29 October 2020

अनिरुद्ध वनकर हे साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीतील विदर्भातील मोठं नाव आहे. सोबतच ते गीतकार आणि संगीतकारही आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला बळ मिळतेय.

नागपूर : विधानपरिषदेवर राज्यपाल कोट्यातून निवडायच्या १२ जागांपैकी महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांनी प्रत्येकी चार जागा वाटून घेतल्या आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भाला प्रतिनिधित्व देणार नाही, हे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. पण काँग्रेस विदर्भातून एक उमेदवार देईल, अशी चर्चा सुरू आहे. त्यातच काँग्रेसने आज चंद्रपूरमधील अनिरुद्ध वनकर यांचे नाव जवळपास निश्‍चित केल्याचे बोलले जात आहे. 

अनिरुद्ध वनकर हे साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीतील विदर्भातील मोठं नाव आहे. सोबतच ते गीतकार आणि संगीतकारही आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला बळ मिळतेय. वनकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून एमएफए आणि एमए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मुंबई विद्यापीठातून लोककला अकादमीचा डिप्लोमा आणि रामटेक संस्कृत विद्यापीठातून नाट्यकलेचा डिल्पोमा केला आहे. गायक कलावंत म्हणून त्यांची ओळख आहे. आतापर्यंत राज्यभर त्यांनी गायनाचे कार्यक्रम केलेले आहेत. याशिवाय छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरातमध्येही त्यांनी भरपूर कार्यक्रम केलेले आहेत. १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते झाडीपट्टी रंगभूमीशी जुळलेले आहेत. 

हेही वाचा - प्रेमाचं अनोखं उदाहरण! शेतकऱ्याने पार पाडले मृत बैलाचे दशक्रिया विधी; लोकांना दिले...

वनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'घायल पाखरा'चे १०० पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. याशिवाय धम्माच्या वाटेवर,  सुंदर माझे घर,  अंधारवाट, वादळाची सावली, रमाई, स्मशान पेटला आहे, आदी कलाकृती गाजल्या आहेत. डॉ. प्रकाश बाबा आमटे या सिनेमात त्यांनी भूमिका केलेली आहे आणि गीतकार, संगीतकार म्हणून काम केले आहे. याशिवाय स्टार प्रवाह वाहिनीवर कुलस्वामिनी, झी मराठीवर रंग माझा वेगळा आणि सह्यांद्री वाहिनीवर तिसरा डोळा आणि अग्निपरीक्षा या मालिकांमध्ये काम केले आहे. कलेच्या क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. 

हेही वाचा - खासदार हेमंत पाटील गेले शेतकऱ्यांच्या दारी, जाणून...

वनकर यांना मिळालेले पुरस्कार - 

  • अण्णाभाऊ साठे पुरस्कार - १९९७ 
  • नेहरू युवा पुरस्कार - १९९८ 
  • लोकसूर्य पुरस्कार - २०१६ 
  • आंबेडकर रत्न पुरस्कार - २०१६ 
  • महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार - २०१६ 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anirudh vankar may be finalized as congress candidate for council election