खासदार हेमंत पाटील गेले शेतकऱ्यांच्या दारी, जाणून घेतल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या वेदना

विनोद कोपरकर
Thursday, 29 October 2020

उटी येथे आठवड्यापूर्वी पंजाबराव गावंडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने वीज तारांना स्पर्श करून आत्महत्या केली. खासदार हेमंत पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

 महागाव (जि. यवतमाळ) : परतीच्या पावसाने उद्‌ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची मनस्थिती जाणून घेण्यासाठी खासदार हेमंत पाटील आज, बुधवारी तालुक्‍यात दाखल झाले. थेट शेतकऱ्यांच्या दारी जाऊन त्यांनी त्यांच्या वेदनांची दखल घेतली. 

उटी येथे आठवड्यापूर्वी पंजाबराव गावंडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने वीज तारांना स्पर्श करून आत्महत्या केली. खासदार हेमंत पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. उटी येथील संत गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. अतिपावसाने सोयाबीनची झालेली नासाडी आणि कापसाची दुर्दशा त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली.

वर्धा नदीत सापडली दुर्मिळ `बोद` मासोळी, विक्रेत्यांमध्ये उत्साह 
 

गावातील इतर समस्यांचा त्यांनी आढावा घेतला. तहसीलदार नामदेव ईसाळकर, गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड, तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे, आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण, वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता विनोद चव्हाण व शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी हजर होते. दुपारी हिवरा येथे महादेव मंदिर कामाचे भूमिपूजन, संगम येथील महंत महाराजांची भेट, थार ते हिवरा रस्त्याचे उद्‌घाटन, फुलसावंगी पीएचसी व महागाव येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी आणि महागाव येथे विविध विभागांच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. 

 

शेपूट नसलेला श्वान बघितला ना! कधी प्रश्न पडला, का कापले असावे शेपूट? 

 

शेतकऱ्याने घेतले विष 

खासदार हेमंत पाटील यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयात आढावा सभा सुरू असतानाच पीककर्ज मिळत नसलेल्या पंडित काळू पवार (वय ५०) या शेतकऱ्याने भांब या गावी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शेतकरी नेते डी. बी. नाईक यांनी आढावा सभेत हा गंभीर विषय लगेच उपस्थित केला. त्यानंतर खासदार पाटील यांनी संताप व्यक्त करून या शेतकऱ्याचे दुर्दैवाने बरे-वाईट झाले तर बॅंक मॅनेजरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मागील कर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्याला मिळाला. मात्र, नवीन पीककर्जाचे प्रकरण मागील तीन महिन्यांपासून येथील स्टेट बॅंकेच्या शाखेत प्रलंबित आहे.  

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Hemant Patil visited flood affected farmers