पालिकेवर वार्षिक दहा कोटींचा भुर्दंड

File photo
File photo

पालिकेवर वार्षिक दहा कोटींचा भुर्दंड
नागपूर : घराघरांतून कचरा संकलनाचा कनक रिसोर्सेस मॅनेजमेंटचे कंत्राट फेब्रुवारीमध्ये संपुष्टात येणार आहे. यामुळे बचतगटांना हे काम देण्याच्या प्रस्तावावर महापालिका विचार करीत आहे. बचतगटांना काम दिल्यानंतर कचरा संकलनाचे व्यवस्थापन नव्याने करण्यासोबतच अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही पालिकेला सहन करावा लागणार आहे. हा भुर्दंड वार्षिक दहा कोटींवर राहणार असल्याने आर्थिक संकटातील पालिकेचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्‍यता आहे.
शहर स्वच्छतेसाठी महापालिकेने 2009 पासून घराघरांतून कचऱ्याची उचल, संकलन व डम्पिंग यार्डपर्यंत कचरा वाहून नेण्याचे कंत्राट कनक रिसोर्सेस मॅनेजमेंटला दिले. सध्या महापालिका 1306 रुपये प्रतिटन याप्रमाणे कनक रिसोर्सेसला पैसे देत आहे. दररोज 1100 टन कचऱ्याची उचल केली जात असून महापालिकेला सध्या 51 कोटी 71 लाख 76 हजार रुपये खर्च येत आहे. फेब्रुवारीमध्ये "कनक'चा कंत्राट संपुष्टात येणार असल्याने बचतगटांना घराघरांतून कचरा संकलनाचे काम देण्यावर विचार होत आहे. बचतगटांना प्रतिघर प्रतिमहिना 53 रुपये देण्याचा विचार पुढे आल्याचे मनपातील सूत्राने नमूद केले. त्यानुसार शहरातील साडेपाच लाख घरातून कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेला वार्षिक 34 कोटी 98 लाख रुपये खर्च येणार आहे. परंतु, बचतगट शहरातील 170 संकलन केंद्रांपर्यंतच हा कचरा आणणार आहे. त्यामुळे संकलन केंद्रापासून भांडेवाडी डम्पिंग यार्डपर्यंत कचरा वाहून नेणारी वाहने, त्यावरील डिझेल, वाहनचालक, वाहनात कचरा टाकणाऱ्या मजुराचे वेतन आदी खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.
तूर्तास कचरा संकलन केंद्रावरून भांडेवाडीपर्यंत कचरा वाहून नेण्यासाठी कनकची 120 वाहने असल्याचे कनक रिसोर्सेसचे कमलेश शर्मा यांनी नमूद केले. किमान एवढ्याच वाहनांची सोय महापालिकेला करावी लागणार आहे. या वाहनांवरील वाहनचालकांच्या 22 हजार रुपये प्रतिमहिना वेतनाचा विचार केल्यास महापालिकेला 3 कोटी 16 लाख, डिझेलचा 12 कोटीचा वार्षिक खर्च येईल. वाहनांत कचरा भरण्यासाठी प्रतिवाहन किमान दोन मजुरांची गरज पडणार असून एका मजुराचे वेतन 16 हजार रुपये प्रतिमहिना आहे. 240 मजुरांसाठी 4 कोटी 60 लाख 80 हजार रुपये वार्षिक खर्च करावा लागणार आहे. याशिवाय वाहनांच्या देखभालीसाठीही पाच ते सात कोटी रुपये वार्षिक खर्च येणार आहे. बचतगटांना देय तसेच संकलन केंद्रापासून भांडेवाडीपर्यंत कचरा वहन करण्याचा एकूण 60 लाख रुपये खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. सध्याच्या कनक रिसोर्सेला देण्यात येणाऱ्या 51 कोटींच्या तुलनेत हा खर्च 8 कोटींनी अधिक आहे.
वाहन खरेदीसाठी अतिरिक्त खर्च
पालिकेला घराघरांतून कचरा संकलनाच्या सायकल गाड्या, लहान गाड्यांसह कचरा वाहून नेणारे मोठे ट्रक, जेसीबी आदी खरेदीसाठीही अतिरिक्त कोट्यवधींचा खर्च करावा लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com