तूर खरेदीला दुसऱ्यांदा मुदतवाढ

file photo
file photo

अमरावती : संपलेल्या खरीप हंगामातील तूर खरेदीला पुन्हा 14 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 20 मेपर्यंत शेतकऱ्यांना शासकीय केंद्रांवर तूर विकता येणार आहे. राज्यात सर्वच केंद्रांवर नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर खरेदी अद्याप झालेली नाही. एकट्या अमरावती जिल्ह्यात 20 हजार 968 शेतकरी अद्याप तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुरीच्या शासकीय खरेदीला प्रारंभ झाला. या खरेदीची मुदत 20 एप्रिलला संपली. मात्र त्यावेळी हजारो शेतकऱ्यांची तूर खरेदी झालेली नव्हती. नोंदणी केल्यानंतर खरेदी करणे अपेक्षित असल्याने मुदतवाढीच्या मागणीने जोर धरला. त्यामुळे नाफेडने 6 मेपर्यंत अल्प मुदतवाढ दिली. या मुदतीत खरेदीचा प्रयत्न फेडरेशनने केला खरा, मात्र तो फारसा फलद्रूप झाला नाही. सोमवारी (ता. 6) सायंकाळी खरेदीची मुदत संपणार असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे त्या नोंदणीकृत शेतकऱ्यांमध्ये रोष उफाळण्याची शक्‍यता लक्षात घेता फेडरेशनने आधीच पुन्हा मुदतवाढीची आगाऊ मागणी नोंदविली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने संभाव्य संकट टळले.
20 मेपर्यंत तूर खरेदी करता येऊ शकणार असल्याचे नाफेडने फेडरेशनला कळविले आहे. या मुदतीत शिल्लक नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली नाही तरी यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे खरेदीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 14 दिवसांत तूर खरेदी करता यावी यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने नियोजन करीत खरेदी कार्यक्रम आखला आहे. प्रत्येक केंद्रावर दर दिवशी किती शेतकरी बोलवावेत याचा आराखडा तयार करून खरेदी यंत्रणेत वाढ केली आहे. यामुळे खरेदी सुरळीत होऊ शकेल असा विश्‍वास जिल्हा मार्केटिंग अधिकारी (प्र) कल्पना धोपे यांनी व्यक्त केला. जिल्हाभरात यामुळे दरदिवशी 400 शेतकऱ्यांची तूर खरेदी करता येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
अमरावती जिल्ह्यात 33 हजार दोन शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून पहिल्या मुदतवाढीअखेर 13 हजार 34 शेतकऱ्यांची तूर खरेदी करता आली आहे. उर्वरित 20 हजार 968 शेतकऱ्यांना संदेश देण्यात आले आहेत. त्यांना दिवस व वेळ देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com