सुपरने दिले दोन वर्षांच्या अनुष्काला जीवनदान

नागपूर - दोन वर्षांच्या अनुष्काला जीवनदान देणारी डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वातील टीम.
नागपूर - दोन वर्षांच्या अनुष्काला जीवनदान देणारी डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वातील टीम.

नागपूर - आईने स्वेटरला लावलेले सेफ्टी पिन काढून बाजूला ठेवली असताना जवळच खेळत असलेल्या दोन वर्षांच्या अनुष्काने सेफ्टी पिन तोंडात घातली. नकळत ती पिन अन्ननलिकेत अडकली. जबलपूरच्या बाजूला असलेल्या मंडला गावातील ही घटना. सेफ्टी पिन गिळल्याचे लक्षात येताच आईने हंबरडा फोडला. खासगीसह अनेक सरकारी दवाखान्यातून बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र मंगळवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जोखीम स्वीकारत गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागातील डॉक्‍टरांनी एन्डोस्कोपीच्या मदतीने ही पिन बाहेर काढली. नशीब बलवत्तर म्हणून चिमुकलीचे प्राण वाचले. लेकीचा जीव वाचल्याची माहिती मिळताच चिमुकलीची आई डॉक्‍टरांसमोर नतमस्तक झाली. येथील डॉक्‍टरांनी धीर देत अनुष्का ठणठणीत असल्याचे सांगताना मातेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

सुपर स्पेशालिटीचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागप्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात तीन तासांच्या डॉक्‍टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर एन्डोस्कोपीच्या मदतीने पिन काढण्यात यश आले. अनुष्का गैगवाल ही दोन वर्षांची चिमुकली गुरुवारी मंडला गावात आईशेजारी बसली होती. वडील महेश हातमजुरीला गेले होते. थंडीचे दिवस असल्याने आई लताने घातलेले स्वेटर सकाळी काढले. स्वेटर फाटले असल्याने पिन लावली होते. पिन काढून बाजूला ठेवली. आई पिन उचलण्यास विसरून गेली. मात्र चिमुकल्या अनुष्काने खेळता-खेळता पिन गिळून तोंडात घातली. नंतर ती उलटी करू लागली. पिन गिळल्याचे आईच्या लक्षात येताच आईने हंबरडा फोडला. सारा गाव जमा झाला. पाठीवर थाप मारून काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र पिन आणखी अन्ननलिकेत रुतून बसली. गावातील दवाखान्यात नेले. नंतर जबलपूरच्या खासगी रुग्णालयात हलवले. परंतु डॉक्‍टरांनी हात वर केले. अनुष्काची उलटी थांबत नव्हती. अखेर सोमवारी सायंकाळी मेडिकलमध्ये आणले. मंगळवारी सुपरमध्ये रेफर करण्यात आले. बुधवारी पिन काढण्यात येईल, असे ठरविण्यात आले. मात्र सुटी असल्याने मंगळवारीच एन्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या प्रक्रियेत डॉ. सुधीर गुप्ता यांच्यासह डॉ. अमोल समर्थ, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. हरित कोठारी, डॉ. रवी दासवानी, डॉ. अभय गाणार, डॉ. योगेश झंवर, डॉ. इम्रान सय्यद, डॉ. विनीत गुप्ता, डॉ. साहिल परमार यांच्यासह सोनल गट्टेवार, रेखा केणे, शशीकला डबले, सायमन मडिवार यांनी सहकार्य केले.

सेफ्टी पिन अन्ननलिकेत उफराटी होती. यामुळे एन्डोस्कोपीद्वारे थेट काढताना अन्ननलिका टोकदार भागाने चिरली जाण्याची भीती होती. रक्तस्त्रावामुळे अनुष्काच्या जिवाला धोका होता. यामुळे पिन अन्ननलिकेतून पोटात ढकलण्यात आली. यानंतर डब्बल बलूनच्या सहकार्याने पिनच्या मागच्या बाजूला पकडून काढण्यात आली.
- डॉ. सुधीर गुप्ता, विभागप्रमुख गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, सुपर स्पेशालिटी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com