निसर्गप्रेमींमध्ये चिंता ; जंगलातून दिसेनासे होताहेत आवळा, करू, बेल, चारोळीचे वृक्ष 

मिलिंद उमरे
रविवार, 12 जुलै 2020

उन्हाळ्यात हा अधिकच शुभ्र होत असल्याने इंग्रजीत याला इंडियन घोस्ट ट्री म्हणतात. याचा डिंक मौल्यवान असल्याने डिंकासाठी या झाडाला ठिकठिकाणी खाचा पाडून अखेर त्याचा खून करण्यात येतो.

गडचिरोली : अलीकडे बाजारात येणारे टोमॅटोच्या आकाराचे संकरित आवळे तुम्ही नेहमीच बघत असाल. पण, रानात उगवणाऱ्या छोट्याशा रानआवळ्याची आंबटगोड, तुरट चव कधी घेतली हे आठवतेय का ?, मागील काही वर्षांत रानआवळा दिसणेसुद्धा दुरापास्त झाले आहे. केवळ आवळाच नव्हे, तर करू, बेल, चारोळी, बिबा, लेंझा किंवा मैदा लकडी, तिवस असे अनेक वृक्ष कमी होताना दिसत आहेत. याबद्दल निसर्गप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत असली, तरी सरकारचे या वृक्षांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 

हे वाचा—'माझ्याशी लग्न कर अन्‌ बायकोला हाकलून दे' प्रेयसीने तगादा लावल्याने प्रियकराने उचलले हे पाऊल...

आयुर्वेदाने आवळ्याला मानले अमृतफळ 
आयुर्वेदाने आवळ्याला अमृतफळ मानले आहे. आरोग्यसंपन्न होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या च्यवनप्राशसारख्या औषधात मुख्य घटक आवळाच असतो. अनेक आजारांवर व अकाली वृद्धत्व येऊ न देण्यासाठी आवळा प्रसिद्ध आहे. पण, मागील काही वर्षांत जंगलातील आवळ्याची झाडेच कमी झाली आहेत. जी दिसतात त्यांना आवळे लागलेले दिसत नाहीत. मध्यंतरी संकरित आवळ्याची अनेक ठिकाणी लागवड झाली. त्यामुळे मोठ्या आकाराचे हे आवळे बाजारात दिसत असल्याने कुणालाही खऱ्या गावरान आवळ्याची आठवण राहिली नाही.आवळ्याचे झाड चढायला कठीण, बारीक खोडाचे असते आणि फळे उंच फांद्यावर लागतात. त्यामुळे ही फळे मिळवण्यासाठी आवळ्याच्या फांद्या छाटतात किंवा वृक्षच तोडतात. तीच गत बेलाची पण होते. श्रावणमासापासून सुरू होणाऱ्या व्रतवैकल्यात शिवपिंडीवर मोठ्या प्रमाणात बेलपत्र वाहिले जाते. त्यासाठी अनेकजण पाने तोडण्याऐवजी बेलपत्र विकणारे वृक्षच तोडून आणतात. दसऱ्यात दिल्या जाणाऱ्या आपट्याच्या वृक्षाबाबतही असेच घडते. याशिवाय सुक्‍यामेव्यामध्ये समाविष्ट चारोळी नीट तोडण्याचा कंटाळा आल्याने काहीजण वृक्ष तोडून टाकतात. करू हा अतिशय सुंदर वृक्ष असतो. उन्हाळ्यात हा अधिकच शुभ्र होत असल्याने इंग्रजीत याला इंडियन घोस्ट ट्री म्हणतात. याचा डिंक मौल्यवान असल्याने डिंकासाठी या झाडाला ठिकठिकाणी खाचा पाडून अखेर त्याचा खून करण्यात येतो. त्यामुळे या वृक्षांची संख्याही घटली आहे. अनेक आजारांवर प्रभावी असलेल्या बिब्याचे वृक्षसुद्धा आता दिसेनासे होत आहेत. लेंझा किंवा मैदा लकडी व तिवस वृक्षही असेच कमी होत आहेत. जंगलाला लागणारे किंवा बहुतांश वेळेस कृत्रिमरित्या लावण्यात येणारे वणवे अशा अनेक वृक्षांच्या अंताचे कारण ठरत आहेत. याशिवायही या वृक्षांची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणे असू शकतील. पण, त्यादृष्टीने विशेष संशोधन झालेले दिसून येत नाही. 

बोंबला! एका चुकीमुळे 78 वर्षीय महिलेच्या अंत्यसंस्काराला जमले 50 लोकं, वाचा...
 

"क्रेन्स' करतेय अभ्यास... 
गडचिरोली जिल्ह्यातील क्रेन्स (कंझर्वेशन, रिसर्च ऍण्ड नेचर एज्युकेशन सोसायटी) वटवाघळांच्या संशोधन प्रकल्पानंतर जैवविविधता प्रकल्पावर काम करत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांच्या जैवविविधता नोंदवह्या (पीबीआर) तयार करण्याचे काम करत असताना ही संस्था जंगलातील कमी होणाऱ्या दुर्मिळ वृक्षांवरही अभ्यास करत आहे. त्यातून अनेक प्रजातींचे वृक्ष कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. याशिवाय ही संस्था ग्रामीण भागांत फिरून पारंपरिक बियाणे संवर्धनाचे कार्यही करत आहे. 

आवळा, बेल, करू, चारोळी, लेंझा, बिबा असे अनेक वृक्ष जंगलातून कमी होताना दिसत आहेत. त्यासाठी वनविभागाच्या रोपवाटीकांमध्ये व इतर प्रकल्पात या वृक्षांच्या बियांपासून रोपे तयार करणे व त्याची लागवड करण्याचे कार्य करायला हवे. त्यासाठी या तंत्रात पारंगत व्यक्ती किंवा संस्थांची मदत घ्यायला हवी. तेव्हाच पुढील पिढ्या हे महत्त्वपूर्ण वृक्ष बघू शकतील. 
- डॉ. अमित सेटिया, वनस्पती तज्ज्ञ तथा संशोधक, क्रेन्स (कंझर्वेशन, रिसर्च ऍण्ड नेचर एज्युकेशन सोसायटी), गडचिरोली 

-संपादन : चंद्रशेखर महाजन  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anxiety in nature lovers; Amla, Karu, Bell, Charoli trees are disappearing from the forest