महिला रुग्णालयाच्या कार्यादेशाला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

भंडारा : जिल्ह्यात महिलांसाठी सुसज्ज व स्वतंत्र रुग्णालयाची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. 2013 मध्ये आघाडी शासनाच्या काळात जिल्ह्यासाठी स्वतंत्र महिला रुग्णालय मंजूर झाले. परंतु, कधी जागेचा प्रश्‍न, कधी निधीची अडसर तर कधी प्रशासनाची अनास्था यामुळे तब्बल सहा वर्षानंतरही काम सुरू होऊ शकले नाही. दरम्यानच्या काळात रुग्णालयाच्या बांधकामाचे बजेट वाढल्याने हा विषय आणखी रेंगाळण्याची स्थिती होती. मात्र, पालकमंत्री परिणय फुके यांच्या प्रयत्नाने बांधकामाचे कार्यादेश निघाले असून, भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होणार आहे.

भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. महिला रुग्णालय गोंदिया जिल्ह्यात गेले. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात स्वतंत्र महिला रुग्णालयाची मागणी करण्यात येत होती. आघाडी सरकारच्या काळात 100 खाटांच्या महिला रुग्णालयाला मंजुरी मिळाली. परंतु, त्यानंतर
जागा शोधण्यात काही वर्षे निघून गेली. अखेर महिला रुग्णालयासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पालगतची जागा निश्‍चित करण्यात आली.
स्वतंत्र महिला रुग्णालयाच्या मागणीसाठी मोर्चे, उपोषण, आंदोलन करण्यात आले. ऑगस्ट 2016 मध्ये जिल्हा प्रशासनाने महिला रुग्णालयाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. तो प्रस्ताव मंजूर झाला. रुग्णालयाच्या बांधकामाचे पूर्वीचे अंदाजपत्रक 2016-17 च्या दरपत्रकावर आधारित तयार करण्यात आले होते. कामाची किंमत 43 कोटी 60 लाख रुपयांवरून नव्या अंदाजपत्रकानुसार 52 कोटींवर गेली. 20 ते 25 टक्‍के वाढ झाल्याचे कारण पुढे करीत नवीन अंदाजपत्रक तयार करण्यात यावे व त्याला उच्चस्तरीय समितीकडून प्रशासकीय मंजुरी घेण्यात यावी, असे आदेश आरोग्य संचालनालयाने काढले होते. परंतु, हा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे पडून होता. अखेर या समितीने हिरवा कंदील दिल्याने रुग्णालयाचा मार्ग सुकर झाला. या कामाच्या अंदाजपत्रकामध्ये विद्युतीकरण, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वॉलकम्पाउंड, अंतर्गत रस्ते, मायनर ब्रिज, सीडीवर्क, रेनवॉटर हार्वेस्टिंग, फर्निचर, पार्किंग व्यवस्था, आग प्रतिबंधक व्यवस्था, बाग, धोबीघाट, धर्मशाळा, पंप हाउस, वातानुकूलित यंत्रणा, प्रसाधनगृह, पब्लिक फॅसिलिटी सेंटर, सीसीटीव्ही, सेंट्रल ऑक्‍सिजन, जनरेटर, बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट आदींसह आकस्मिक खर्च, विमा, संगणकीकरण आदींचा समावेश आहे. पालकमंत्री परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महिला रुग्णालयाच्या बांधकामाला मंजुरी प्रदान करून अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांमध्ये समाविष्ट करण्याबाबतची मागणी केली होती. याच महिन्यात बांधकामासाठी भूमीपूजन केले जाणार अशी माहिती आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approval of Women's Hospital Office