नागपूरने दिली लष्कराला 'मार्शल ट्यून'

भारतीय सैन्याचे प्रमुख बिपीन रावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या ताम्रपत्रासह गायिका-संगीतकार डॉ. तनुजा नाफडे.
भारतीय सैन्याचे प्रमुख बिपीन रावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या ताम्रपत्रासह गायिका-संगीतकार डॉ. तनुजा नाफडे.

नागपूर - देशाच्या सुरक्षेसाठी डोळ्यांत तेल ओतून सीमेवर पहारा देणाऱ्या लष्करासाठी काही करायला मिळणे, ही कुठल्याही भारतीयासाठी अभिमानाचीच बाब ठरते. गायिका-संगीतकार डॉ. तनुजा नाफडे यांच्या निमित्ताने नागपूरच्या वाट्याला हे भाग्य चालून आले आणि चक्क लष्करासाठी "मार्शल ट्यून' संगीतबद्ध करण्याची संधी त्यांना मिळाली. लष्कराचा सहभाग असलेल्या प्रत्येक राष्ट्रीय सोहळ्यात डॉ. नाफडे यांनी संगीतबद्ध केलेली "मार्शल ट्यून' ऐकायला मिळेल तेव्हा नागपूरची मान देशात उंचावलेली असेल.

इंग्रजांच्या काळापासून पाश्‍चिमात्य संगीताचा प्रभाव असलेल्या "मार्शल ट्यून' भारतीय लष्करासाठी वाजविली जाते. अर्थात, देश स्वतंत्र झाल्यावर तयार झालेली मार्शल ट्यूनही इंग्रजाळलेलीच होती. अर्थात, त्यातही एक रिदम, एक प्रेरणादीय स्वर होताच. पण "मार्शल ट्यून'च्या संगीतात भारतीयत्वाची उणीव होती. डॉ. नाफडे यांनी ही उणीव भरून काढली आहे. महार रेजिमेंटच्या हीरक महोत्सवानिमित्त रेजिमेंटच्या कामगिरीवर आधारित एक गाणे संगीतबद्ध करून घ्यायचे होते. मेजर जनरल ओक हे डॉ. नाफडे यांच्या पतीचे मित्र असल्यामुळे त्यांनी हे गाणं संगीतबद्ध करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. दिल्लीतील निवृत्त ब्रिगेडीयर विवेक सोहेल यांनी लिहिलेल्या "देश को आंच ना आने दी' या गीताला डॉ. तनुजा नाफडे यांनी संगीतबद्ध केले.

"अस्सल भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चिमात्य हार्मनीचा मेळ साधून लष्करातील 36 वादकांना सोबत घेत त्यांनी हे गीत संगीतबद्ध केले. 36 जवानांना दररोज याचे प्रशिक्षण दिले आणि एक उत्तम गाणे तयार झाले. मात्र, हे गाणे ऐकल्यावर संपूर्ण लष्कराचीच "मार्शल ट्यून' संगीतबद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. ही ट्यून यशराज स्टुडिओमध्ये संगीतबद्ध केली. सुदैवाने मंजुरीच्या कठोर प्रक्रियेतून या ट्यूनची भारतीय लष्करासाठी निवडण्यात आली,' असे डॉ. नाफडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. स्वातंत्र्य दिन तसेच प्रजासत्ताकदिनी लष्करी संचलनाच्या वेळी ही "मार्शल ट्यून' आता संपूर्ण देशाला ऐकायला मिळणार आहे, हे विशेष. या कामासाठी डॉ. तनुजा नाफडे यांना अलीकडेच लष्कराप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिल्लीतील सोहळ्यात ताम्रपत्र देऊन गौरविले.

लष्कराच्या या अंगाविषयी मला काहीच माहिती नव्हते. पण तरीही साधनेच्या जोरावर मी हे काम करू शकले. भारतीय लष्करासाठी मी काहीतरी करू शकले यातच माझा जन्म सार्थकी लागला.
- डॉ. तनुजा नाफडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com