ज्यांनी लोककलांमध्ये घालवले संपूर्ण आयुष्य त्यांच्याच नशीबी यातना.. वृद्ध कलावंत सात महिन्यांपासून मानधनाविना

artist in amravati district did not get payment from last 8 months
artist in amravati district did not get payment from last 8 months

तळेगावठाकूर (जि. अमरावती) :  महाराष्ट्र शासनांतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीत नोंदणीकृत वयोवृद्ध कलावंतांना सात महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. शासनाच्या काही नियम व अटींमुळे या मानधनापासून अनेकांना मुकावे लागत आहे. त्यातच कोरोनासारख्या महामारीमुळे त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भजन-कीर्तनाच्या माध्यमातून वयोवृद्ध कलावंत समाजातील तळागाळापर्यंत प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. मात्र, हेच कलावंत सात महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत शासन नोंदणीकृत कलावंतांना तीन श्रेणीनुसार मानधन दिले जाते. वृद्ध कलावंतांना 2700, 2500, 2200 रुपये अशाप्रकारे मानधन दिले जाते. कोरोनाच्या संकटामुळे शासनाने सर्वत्र लॉकडाउन केल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. वयोवृद्ध कलावंतांकडे रोजगाराचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे त्यांचे मानधन रोखू नये, अशी मागणी कलावंतांकडून होत आहे.

विशेष म्हणजे, जानेवारीमध्ये शासन परिपत्रकानुसार नवीन समिती गठित करण्याचे आदेश आहेत. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनात व आदेशानुसार समिती गठित होते. मात्र, या बाबीला उशीर होत असल्याने वृद्ध कलावंतांना मानधनासाठी वाट पाहवी लागत आहे. अमरावती जिल्ह्यात पाच हजारांवर कलावंत आहेत. तिवसा तालुक्‍यात समाजप्रबोधन करणारी कितीतरी मंडळी व कलावंत आहेत. मात्र, येथील पंचायत समितीला एकूणच ९७ वृद्ध कलावंतांची नोंद आहे. यातील सर्वच कलावंत सर्वसामान्य असल्याने मिळणाऱ्या मानधनातून काही प्रमाणात उदरनिर्वाह होतो. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून त्यांना आर्थिक चणचण भासत आहे.

लवकरच समिती गठीत करण्यात येईल 
नोंदणीकृत कलावंतांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. यामध्ये लवकरच कलावंत समिती गठित करण्यात येऊन वृद्ध कलावंतांना त्यांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
- यशोमती ठाकूर, 
पालकमंत्री, अमरावती.

तत्काळ मानधन जमा करावे 
कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत वृद्ध कलावंतांचे हाल होत असताना पाच-सहा महिन्यांपासून वृद्ध कलावंतांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे शासनाने कलावंतांचे मानधन तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करावे.
-सुधाकर राऊत, 
सचिव, वृद्ध कलावंत समिती, तिवसा.

कलाकृतीला जपून शासनाने कलावंतांना मदत करावी
मी ४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात समाजप्रबोधनासह शासनाच्या जनजागृतीचे कार्यक्रम घेतले. शासनाच्या वतीने अनेक वेळा माझा सन्मानसुद्धा करण्यात आला. शासनदरबारी वृद्ध कलावंतांची नोंद व्हावी याकरिता मी आवाज उठवून अनेक कलावंतांची नोंद करून घेतली. आता शासनाकडे एकच मागणी आहे की, वयोवृद्ध कलावंतांच्या कलाकृतीला जपून शासनाने वेळोवेळी कलावंतांना मदत करावी.
-शंकरराव थोरात, 
तळेगाव ठाकूर.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com