४० चित्रकारांनी चितारला उघड्या डोळ्यांचा बुद्ध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नागपूर - बुद्धपौर्णिमा ही जगाला शांततेचा, अहिंसेचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांची जयंती. या मंगलदिनाचे निमित्त साधून उपराजधानीत रंगरेषा आणि ब्रशच्या लिपीतून देशभरातील चित्रकारांनी बुद्ध चित्रचळवळ चितारली.

नागपूर - बुद्धपौर्णिमा ही जगाला शांततेचा, अहिंसेचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांची जयंती. या मंगलदिनाचे निमित्त साधून उपराजधानीत रंगरेषा आणि ब्रशच्या लिपीतून देशभरातील चित्रकारांनी बुद्ध चित्रचळवळ चितारली.

एकप्रकारे बुद्धाच्या धम्मक्रांतीचे प्रतीक असलेल्या दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी बुद्धपौर्णिमेच्या पर्वावर उघड्या डोळ्यांचा बुद्ध चितारून ४० चित्रकारांनी बुद्धाच्या सम्यक दृष्टीची ओळख करून दिल्याचा भास बुद्ध चित्र रेखाटनातून होतो. विशेष असे की, चित्रकारांच्या चित्र विक्रीतून गोळा झालेला निधी महिलांना स्वयंरोजगारासाठी देण्यात येईल. येथेही बुद्धाची दानपारमिता हाच संदेश पेरण्याचा अनोखा उपक्रम लालित्य फाउंडेशनतर्फे राबविण्यात येईल.     

नागपूरच्या इमामवाडा येथील एका हॉटेलमध्ये दिल्ली, मुंबई, बनारस, ग्वालियरमधील  चित्रकार बुद्धाच्या विविध छटांना कॅनव्हासवर उतरवत आहेत. या चित्रकारासाठी रंगरेषांच्या लिपीतून काढलेले चित्र म्हणजे एकप्रकारे कविताच. या चित्रातून बुद्धाचा निसर्गाशी समरस होण्याच्या सिद्धांतापासून तर समतेचा संदेश देणारे बुद्ध चित्र रंगवताना साऱ्या विविध भाषिक चित्रकारांचे  बुद्ध चित्रचळवळीचे एकमेकांशी नाते असल्याचे चित्र येथे दिसून आले. रंग आणि रेषांतून माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तींची, संवेदना-भावना-विचारांची भाषा कळते. हे खरे असले तरी उघड्या डोळ्यांचा बुद्ध चितारणे म्हणजे बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञांएवढेच विद्रोही आहे, असे एका चित्रकाराने येथे सांगितले. बुद्धाचा आकार हाच विचार असून एकप्रकारची निसर्ग चळवळ आहे, असे चित्रकार मिठालाल सांगतो. बुद्धाचे एक चित्र मेंदूच्या पलीकडचा विचार सांगत असल्याचे दिनेश गुडधे सांगतात.

अंधाराला उजेड होण्यास भाग पाडणारे बुद्धाचे चित्र दीक्षा गुप्ताने चितारले. बुद्ध नेहमीच उघड्या डोळ्यांचा होता. त्याला मूर्तिकारांनी रंगबद्ध करताना चुकीने डोळे बंद केले असावेत असा संकेत देत रंग-रेषा डोळे उघडे असलेला बुद्ध साकारणे ही कलेची ‘ग्लोबल लॅंग्वेज’ असल्याचे ‘एम्स’मध्ये मुख्य आर्टिस्ट असलेले रामचंद्र पोकळे सांगतात. 

नागपूरच्या नमोबुद्धाय चित्र कार्यशाळेत रामचंद्र पोकळे, ए. के. आझाद, जे. पी. सिंग, प्रीती सक्‍सेना, चित्रा सिंग, प्रदीप कुमार, बुलिस्टीन, चंदना वानवे (गोंदिया), अजय मेश्राम (मुंबई), अनुराज जाडिया, त्राप्ती गुप्ता (ग्वालियर), लक्ष्मण चव्हाण (उस्मानाबाद), कुणाल मून (मुंबई), मिठाईवाला (बनारस), धर्मेंद्र लोणे (नांदेड), संजय तांडेकर (मुंबई), लतिफ खान (वर्धा), प्रियंका सिन्हा (गाझियाबाद), गिरीश फुलझेले, रवी कडवे,दीक्षा गुप्ता, सुधीर तलमले, उमेश चारोळे, संजय मोरे, मनोज देशभ्रतार, योगेश धनकसार सगभागी झाले आहेत. 

नवीन चित्रकारांना संधी उपलब्ध करून देण्यात येते. नमो बुद्धाय कार्यशाळेत रेखाटण्यात आलेले ‘बुद्धा’चे चित्र प्रदर्शन नागपूर, मुंबई, रायपूर, इंदूर येथे लावण्यात येईल. प्रदर्शनात चित्र विक्रीतून गोळा निधीतून दहा महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. 
-प्रसाद पिंपरीकर, लालित्य फाउंडेशन, संस्थापक अध्यक्ष

Web Title: artist buddha drawing