काम जोखमीचे आहे, ३०० रुपये रोजी द्या अन्यथा संपावर जाऊ; आशा, गटप्रवर्तकांनी दिला इशारा   

चेतन देशमुख
Friday, 18 September 2020

आशा व गटप्रवर्तक नियमित कामे करण्यास तयार आहेत. त्या कामाचा मोबदला त्यांना मिळत आहे. मात्र, कोरोना काळात शासनाने जी कामे करून घेतली, त्याचा निश्‍चित मोबदला ठरविला नाही.

यवतमाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी ३०० रुपये रोज देण्यात यावा, या मागणीसाठी आशा व गटप्रवर्तकांनी शुक्रवारी (ता.१८) सकाळी साडेदहा वाजता सीईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी एक तास चर्चा केली. मात्र, बोलणी अयशस्वी झाली नाही. त्यामुळे आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) यांनी संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. 

आशा व गटप्रवर्तक नियमित कामे करण्यास तयार आहेत. त्या कामाचा मोबदला त्यांना मिळत आहे. मात्र, कोरोना काळात शासनाने जी कामे करून घेतली, त्याचा निश्‍चित मोबदला ठरविला नाही. कामाची दखल घेऊन मोबदला वाढवून देण्यात येईल, अशी अपेक्षा आशांना होती. शासनाने ३०० रुपये रोज दिला तरच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’चा सर्व्हे करणार, अन्यथा नाही, असा इशारा प्रशासनाला निवेदनातून दिला होता.

अवश्य वाचा - अल्पशिक्षित मुलीची नोकरीसाठी धडपड सुरू असताना ढकलले वेश्याव्यवसायात
 

त्यानुसार शुक्रवारी सीईओ डॉ. पांचाळ यांनी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना चर्चेसाठी बोलाविले. यावेळी संघटनेची एकही मागणी जिल्हा प्रशासनाने मान्य केली नाही. तीनशे रुपये रोज देणे आपल्या हातात नाही. संघटनेची मागणी शासनाला कळवितो, असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. 

अवश्य वाचा - आला जावयाच्या कौतुकाचा महिना! बाजारात गर्दी, मिठान्न आणि भेटवस्तूंची रेलचेल
 

आयटकने दीडशे रुपये राज्य सरकार देत आहे. दीडशे रुपये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने दिल्यास तीनशे रुपये रोज मिळू शकतो, असे सांगितले. या चर्चेत काहीही निष्पन्न न झाल्याने २१ सप्टेंबरपासून संपाचे हत्यार उपसण्यात येणार आहे. त्यामुळे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणात खोळंबा निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asha workers demanded 300 Rs. for survey of Corona