दोन लाचखोर एएसआय बडतर्फ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

वाळू तस्कराकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या वादग्रस्त दोन सहायक पोलिस उपनिरीक्षकांवर ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी विभागीय कारवाईअंतर्गत त्यांना बडतर्फ करून सेवा समाप्त केली.

नागपूर - वाळू तस्कराकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या वादग्रस्त दोन सहायक पोलिस उपनिरीक्षकांवर ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी विभागीय कारवाईअंतर्गत त्यांना बडतर्फ करून सेवा समाप्त केली. रिश्‍चंद्र बमनोटे (५६) आणि राजू अवजे (५२) अशी बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. 

दोन्ही अधिकारी रामटेक येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत होते. रामटेक तालुक्‍यातील मनसर येथील एक व्यक्ती अवैधपणे वाळूचे उत्खनन करून वाहतूक करीत होता. त्याची गाडी सोडण्यासाठी व भविष्यात कारवाई न करण्यासाठी दोघांनीही त्यांच्याकडून लाचेची मागणी केली. तडजोड करून महिन्याला २५ हजारांत सौदा पक्का करण्यात आला. मात्र, १५ एप्रिलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून त्यांना रंगेहात पकडले. 

सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाला अहवाल पाठवला. त्या अहवालानंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी विभागीय चौकशी करून व अधिकाऱ्यांचा पूर्वेतिहास तपासून त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. तसे आदेश आस्थापना व अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. दोन्ही अधिकारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत होते. त्यांना कोणत्याही प्रकरणात गैरव्यवहार दिसल्यास संबंधित पोलिस ठाण्याला कळवणे आवश्‍यक होते. पण, त्यांनी तसे केले नाही आणि अधिकार नसताना कारवाईची धमकी देऊन लाच मागितली. हा गंभीर प्रकार असल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले, अशी माहिती  राकेश ओला यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

काही वर्षांपूर्वी हरिश्‍चंद्र बमनोटे याला अशाच एका प्रकरणात बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा कामावर घेण्यात आले. पुन्हा शिस्तभंगांतर्गत निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर कामावर रुजू करून घेण्यात आले होते, अशी माहिती समोर येत आहे.

Web Title: ASI terminated for Accepting bribes