अमरावतीत एक हजाराच्या खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

अमरावती : एक हजार रुपयांची खंडणी न दिल्यामुळे चिकन सेंटर चालविणाऱ्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारी (ता. दहा) रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. 

अमरावती : एक हजार रुपयांची खंडणी न दिल्यामुळे चिकन सेंटर चालविणाऱ्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारी (ता. दहा) रात्री पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. 
जुबेर खान सलीम खान (वय 29, रा. धरमझेंडी) असे हल्ल्यातील गंभीर जखमीचे नाव आहे. जखमीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुबेर खान यांचे पठाणचौकात चिकन सेंटर नावाने छोटेसे दुकान आहे. तीन दिवसांपूर्वी जिशान अहमद मोहंमद फारुक, शारीक, गुड्डूसह अन्य एक असे चौघेजण जुबेर यांच्या दुकानावर आले होते. त्यांनी त्याला एक हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास नावेद (पप्पू) बिल्डर्सचा ज्या पद्धतीने खून केला, त्याचप्रमाणे खून केला जाईल, अशी धमकी दिली. गुरुवारी (ता. 10) रात्री जुबेर खान आपल्या काही साथीदारांसोबत वलगाव मार्गावरील असोरिया पेट्रोलपंपाजवळ बसले असता, त्याला जिशानचा फोन आला. त्यानंतर दहा मिनिटात जिशान अन्य तिघा साथीदारांसोबत येथे पोहोचला. त्याने जुबेरखानसोबत वाद घातला. उर्वरित लोकांनी त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर चौघांनी जुबेर खान याच्यावर चाकूने वार करून हत्या करण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर चौघेही पसार झाले. शुक्रवारपर्यंत कुणालाही अटक झाली नाही, असे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले. जखमी जुबेर खान यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध खंडणी व प्राणघातकहल्ला प्रकरणी गुन्हा दाखल झाला. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An assassination attempt for ransom of a thousand in Amravati