esakal | कारवाईचा धाक दाखवून दहा हजार घेणे सहायक पोलिस निरीक्षकाला पडले महागात...वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

सहायक पोलिस निरीक्षक खाडे

वरोरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश खाडे यांनी स्विफ्ट कारमालकाला दूरध्वनी केला. खांबाडा येथील अपघात तुमच्या वाहनाने झाला. त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, असा कारवाईचा धाक दाखवून सहायक पोलिस निरीक्षकाने वाहनमालकाला दहा हजार रुपयांची लाच मागितली. पण झाले उलटेच.

कारवाईचा धाक दाखवून दहा हजार घेणे सहायक पोलिस निरीक्षकाला पडले महागात...वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वरोरा (जि. चंद्रपूर) : अपघाताच्या एका प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी दहा हजारांची मागणी करणाऱ्या येथील सहायक पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. 16) अटक केली. रमेश खाडे, असे लाच घेणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.

चंद्रपुरातील एक व्यक्ती आपल्या स्विफ्ट या चारचाकी वाहनाने प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेऊन 21 मे रोजी बहिणीसह मध्य प्रदेशातील शिवनी गावाकडे निघाले होते. त्यांचे वाहन खांबाडा चेकपोस्ट नाक्‍यावरून समोर गेले. त्याआधी टेमुर्डा ते खांबाडा मार्गावर झालेल्या एका अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

त्यामुळे वरोरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश खाडे यांनी स्विफ्ट कारमालकाला दूरध्वनी केला. खांबाडा येथील अपघात तुमच्या वाहनाने झाला. त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, असे सहायक पोलिस निरीक्षक खाडे यांनी सांगितले.

वाहनमालकाला मागितली दहा हजारांची लाच

या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर काही रक्कम द्यावी लागेल, अशी मागणी त्यांनी वाहनमालकाकडे केली होती. अखेर वाहनमालकाने दहा हजार रुपये देण्याचे कबूल केले. दरम्यान, वाहनमालकाने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. सहायक पोलिस निरीक्षक खाडे यांनी मंगळवारी बोर्डा चौकात पैसे घेऊन बोलाविले होते. वाहनमालक तिथे आधीच हजर होते.

जाणून घ्या : शिकारी कुत्र्यांच्या मदतीने होतोय हा प्रकार, वनविभागात खळबळ


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

सहायक पोलिस निरीक्षक खाडे आल्यानंतर वाहनमालकाने त्यांना दहा हजार रुपये दिले. तेव्हाच दहा हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खाडे यांना ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक रश्‍मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक दुधलवार, उपअधीक्षक अविनाश भांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक वैशाली ढाले, अजय बागेसर, प्रांजल झिलपे, रवींद्र ढेंगळे, वैभ गाडगे, रोशन चांदेकर यांनी केली.