सहायक पोलिस उपनिरीक्षकांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

वाळूचे ट्रॅक्‍टर विनातपासणी सोडण्यासाठी २५ हजारांची लाच मागणाऱ्या रामटेक येथील दोन सहायक पोलिस उपनिरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

रामटेक - वाळूचे ट्रॅक्‍टर विनातपासणी सोडण्यासाठी २५ हजारांची लाच मागणाऱ्या रामटेक येथील दोन सहायक पोलिस उपनिरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. हरीश्‍चंद्र बमनोटे (वय ५६) आणि राजू अवझे (वय ५२) अशी या लाचखोरांची नावे आहेत. दोघेही रामटेक येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत होते. तक्रारदार हे मनसर (ता. रामटेक) येथील रहिवासी असून शेती करतात. त्याचप्रमाणे ट्रॅक्‍टरने वाळूची वाहतूकही करतात. रामटेकपासून तीन किमी अंतरावर असलेल्या सूर नदीतून अवैधरित्या वाळूचा उपसा करून ट्रॅक्‍टरने वाळूची वाहतूक करीत होते. 

सूर नदीतील घाटाचा लिलाव न झाल्याने तक्रारदार व इतर लोक त्यातील वाळूचा उपसा करतात. यापूर्वी तक्रारदारावर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तक्रारदाराचे वाहन सुटल्यानंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक हरीश्‍चंद्र बमनोटे आणि अवझे यांनी तक्रारदारास फोनवर संपर्क करून कार्यालयात बोलावले. ‘वाळूची वाहतूक करायची असेल आम्हाला प्रत्येक गाडीमागे अडीच हजार रुपये असा १३ गाड्यांचे ३२ हजार ५०० रुपये दे’ असे म्हटले. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने  त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. तडजोड झाल्यानंतर त्यांच्यात २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यावरून ८ आणि ९ एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली होती.  त्यात बननोटे आणि अवझे यांनी लाच घेण्याची तयारी दर्शविल्याचे दिसून आले होते. सोमवारी दुपारी बमनोटे याने पैसे घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले. याप्रकरणी रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शेळके, प्रवीण पडोळे, प्रभाकर  बले, लक्ष्मण परतेती, सरोज बुधे, चालक परसराम साई यांनी पार पाडली.

Web Title: Assistant Sub-Inspector arrested in ramtek