ही जेनी आहे तरी कोण.. जिची मेळघाटातील आरोपींमध्ये आहे प्रचंड दहशत.. शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जाही

athe sniffer dog jenny has special treatment like a government officer
athe sniffer dog jenny has special treatment like a government officer

अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्रप्रकल्पात वाघांसह वन्यजीवांच्या संरक्षणार्थ एक श्‍वान तैनात आहे. तिचे नाव जेनी आहे. मेळघाट व्याघ्रप्रकल्पात रुजू झाल्यापासून आतापर्यंत या पाच वर्षांच्या कालखंडात जेनीने विविध तीस गुन्ह्यांतील चाळीस आरोपींचा छडा लावण्यास यश मिळविले. जर्मन शेफर्ड मादी जातीच्या या श्‍वानाने मध्य प्रदेशातील भोपाळ येथे असलेल्या पोलिस विभागाच्या 23 बटालियन अकॅडमीमधून प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जेनी अकोट-मेळघाट व्याघ्रप्रकल्पात 2015 मध्ये रुजू झाली. तेव्हापासून अद्यापही जेनीचा दबदबा दिसून येत आहे. 

मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील हत्तीप्रमाणे जेनीलाही (श्‍वान) शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आहे. त्यामुळे जेनीला व्याघ्रप्रकल्पात स्वतंत्र निवासस्थानासह वाहन, वैद्यकीय रजा, पेन्शन लागू आहे. जेनी भोपाळच्या 23 बटालियन पोलिस अकॅडमी येथून नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून 2015 मध्ये मेळघाट व्याघ्रप्रकल्पात रुजू झाली. तेव्हापासून आजपर्यंत 30 गुन्ह्यांमधील 40 च्यावर आरोपी जेरबंद करण्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला यश आले. यावरून मेळघाट व्याघ्रप्रकल्पात जेनीची आजही दहशत असल्याचे दिसून येत आहे. 

स्निफर डॉग म्हणून आहे ओळख

सध्या व्याघ्रप्रकल्पात जेनी एकमेव प्रशिक्षित श्‍वान आहे. तिच्या सोबतीला गावरान जातीच्या श्‍वानाला वनरक्षक आतिफ हुसेनकडून प्रशिक्षण देणे सुरू आहे. जेनीची ओळख स्निफर डॉग म्हणून आहे. वाघ आणि वन्यजीवांचे शिकारी, त्यांची कातडी-अवयव यासह वनगुन्ह्यातील गुन्हेगारांना शोधून काढण्याचे खास प्रशिक्षण जेनीने पूर्ण केले. जेनी जशी गुन्हेगारांना शोधण्यात माहीर आहे तशीच कर्तव्यावर असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सॅल्यूट मारून शिस्तीचे पालन करणारीही आहे. 

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा 

जेनीला राहण्यासाठी स्वतंत्र शासकीय निवास आहे. क्षेत्रभेटीवर जाताना तिच्यासाठी शासकीय वाहन आहे. सोबतच किरकोळ आणि वैद्यकीय रजा लागू आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे तिच्याकरिता खास शासकीय आहार उपलब्ध असून यामध्ये दररोज अर्धा किलो मांस, सकाळ, संध्याकाळी दूध व पेडिग्री हा पूरक आहार दिला जातो. यासाठी महिन्याला दहा हजार रुपये मिळतात. सोबतच वर्षातून एकदा रेबीज इंजेक्‍शन तर तीन महिन्यांनी जंताचे औषध दिले जात असल्याची माहिती मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील जेनीचा सांभाळ करणारे कर्मचारी आतिफ हुसेन यांनी दिली.

जेनीमुळे अनेक गुन्हे उघडकीस आले
मेळघाट व्याघ्रप्रकल्पात प्राण्यांच्या संरक्षणार्थ जेनी कार्यरत आहे. जेनीची ओळख स्निफर डॉग म्हणून आहे. वाघ आणि वन्यजीवांच्या शिकारी, त्यांची कातडी-अवयव यासह वनगुन्ह्यातील गुन्हेगारांना शोधून काढण्याचे खास प्रशिक्षण जेनीने पूर्ण केले आहे. जेनीमुळे व्याघ्रप्रकल्पातील अनेक गुन्हे उघडकीस आले. आरोपींना जेरबंद करण्यास यश मिळाले.
-आतिफ हुसेन, 
मेळघाट व्याघ्रप्रकल्प. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com