एटीएमकार्ड धारकांनो सावधान! नाकारलेल्या व्यवहारासाठी लागेल शुल्क 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

खाते असलेल्या बॅंकेच्या एटीएमशिवाय इतर बॅंकांच्या एटीएममधून रक्कम काढताना यापुढे खातेदारांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. बॅंक खात्यात जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याचा इतर बॅंकेच्या एटीएममधून प्रयत्न केला व त्या एटीएमने तो व्यवहार नाकारला तर त्या प्रत्येक व्यवहारासाठी सर्व करांसह 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 

अमरावती : एटीएमकार्डधारकाने ज्या बॅंकेचे एटीएम आहे त्या बॅंकेच्या एटीएम व्यतिरिक्त इतर बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला आणि खात्यातील पुरेशा रकमेअभावी तो व्यवहार नाकारला गेला तर त्या एटीएम कार्डधारकाला 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 1 डिसेंबरपासून ही दंडात्मक कारवाई सुरू होत आहे. आयडीबीआय बॅंकेने या संबंधीचा लघु संदेश (एसएमएस) आपल्या एटीएम कार्डधारक खातेदारांना पाठविण्यास सुरवात केलेली आहे. 

एटीएम कार्डधारक ज्या परिसरात राहतो, त्या भागात त्या बॅंकेचे एटीएम नसल्यास किंवा त्या एटीएममध्ये रोकड नसल्यास कार्डधारक इतर एटीएममधून पैसे काढतो. साधारणपणे एका महिन्यात अशा पद्धतीच्या ठराविक व्यवहारांना बॅंकेकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आता मात्र बॅंकेने शुल्क वसुलीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आपल्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, याचे स्मरण अनेकांना राहत नाही किंवा खात्यात असलेल्या जमा रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याचा प्रयत्न अनावधानाने एटीएमकार्ड धारकांकडून होतो. नेमकी हीच बाब आता ग्राहकांसाठी दंडात्मक ठरणारी आहे. 

खाते असलेल्या बॅंकेच्या एटीएमशिवाय इतर बॅंकांच्या एटीएममधून रक्कम काढताना यापुढे खातेदारांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. बॅंक खात्यात जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याचा इतर बॅंकेच्या एटीएममधून प्रयत्न केला व त्या एटीएमने तो व्यवहार नाकारला तर त्या प्रत्येक व्यवहारासाठी सर्व करांसह 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. 

मनुष्यबळासाठी आकारले जाते शुल्क 
जेव्हा एका बॅंकेचा एटीएमकार्डधारक दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून रक्कम काढतो, तेव्हा दुसऱ्या बॅंकेला तो व्यवहार हाताळावा लागतो. ग्राहकांसाठी अदृश्‍य स्वरूपाच्या या व्यवहारापोटी बॅंका एकमेकांकडून शुल्क घेतात. खात्यात पुरेशा रकमेअभावी नाकारलेला व्यवहारसुद्धा बॅंकेसाठी व्यवहारच ठरतो. त्यामुळे खातेदाराच्या बॅंकांना त्या व्यवहाराचा भुर्दंड सहन करावा लागतो. 

बॅंका ठेवतात ताळेबंद 
संगणकीकरणाद्वारे बॅंका एकमेकांना जोडलेल्या आहेत. प्रत्येक एटीएमचे स्वतःच्या बॅंकेत आणि प्रत्येकच बॅंकेचे एकमेकांच्या बॅंकेत खाते असते. जेव्हा ग्राहक दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून व्यवहार करतो, तेव्हा तो एटीएम स्वतःच्या बॅंकेतील खात्यामार्फत त्या बॅंकेच्या त्या खातेदाराच्या खात्यात जाऊन रकमेची शहानिशा करतो. या प्रत्येक स्तरावर व्यवहाराची जमा-नावे नोंद होते. हे सर्व सेकंदात घडते. कोणत्या बॅंकेने आपल्या ग्राहकांना किती रक्कम अदा केली, याचा ताळेबंद बॅंका ठेवतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATM card holders beware! Rejected transaction will cost